लालबाग येथील ‘मुरलीधर उपाख्य बाबा शिंगोटे’ चौकाचे नामकरण; समाजसेवेतील योगदानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गौरव
मुंबईतील लालबाग परिसरातील नारायण उद्योग भवनजवळील चौकाला ‘मुरलीधर उपाख्य बाबा शिंगोटे’ असे नाव देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी बाबा शिंगोटे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवत केलेल्या समाजसेवेचा गौरव केला.
मुंबई प्रतिनिधी नरेश शिंदे
मुंबई | ६ जुलै २०२६ : सामान्य कुटुंबातून कठोर परिश्रमाच्या जोरावर यशस्वी व्यावसायिक आणि अग्रणी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक म्हणून उभे राहिलेले स्वर्गीय मुरलीधर उपाख्य बाबा शिंगोटे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवत समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
मुंबईतील लालबाग परिसरातील नारायण उद्योग भवन जवळील चौकाचे ‘मुरलीधर उपाख्य बाबा शिंगोटे’ असे नामकरण करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बाबा शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेत्यापासून अग्रगण्य वृत्तपत्र समूहाचे संस्थापक होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी पत्रकारिता आणि वृत्तपत्र व्यवसायाला केवळ उद्योग म्हणून न पाहता समाजातील विविध प्रश्न मांडण्याचे आणि ते सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे प्रभावी माध्यम बनविले.
ते पुढे म्हणाले की, बाबा शिंगोटे यांनी वृत्तपत्र क्षेत्रात मोठे विश्व निर्माण केले असून आज त्यांची दुसरी आणि तिसरी पिढीही ही परंपरा समर्थपणे पुढे नेत आहे. व्यवसायात मोठे यश मिळूनही त्यांनी आयुष्यभर साधेपणा जपला आणि कधीही मोठेपणाचा आव आणला नाही. त्यांचा हा गुण समाजासाठी आदर्श असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या चौकाच्या नामकरणामुळे येणाऱ्या पिढ्यांना बाबा शिंगोटे यांच्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची सतत आठवण राहील. समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
कार्यक्रमास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, पुण्यनगरी समूहाचे संचालक अरविंद शिंगोटे, प्रवीण शिंगोटे, भावेश शिंगोटे, प्रतीक शिंगोटे, राजकीय संपादक उदय तानपाठक, संपादक शैलेंद्र शिर्के तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वर्गीय बाबा शिंगोटे यांनी दिलेल्या योगदानाला अभिवादन करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0