पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून पोफाळीत वारकरी बांधवांना भजनी साहित्याचे दिमाखदार वाटप
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील संत गजानन महाराज मंदिरात वारकरी बांधवांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांनी स्वागत केले.
यवतमाळ | प्रतिनिधी रवी वाघमारे
महाराष्ट्राची संत परंपरा, विठ्ठल भक्ती आणि वारकरी संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील संत गजानन महाराज मंदिरात वारकरी बांधवांना भजनी साहित्याचे दिमाखदार वाटप करण्यात आले. राज्याचे मृदा व जलसंवर्धन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
आषाढी वारीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वारकरी बांधवांना टाळ, मृदंग आणि भजन-कीर्तनासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे वारकरी संप्रदायातील भजन-कीर्तनाची परंपरा अधिक बळकट होईल तसेच भावी पिढीला संत साहित्य, अभंग आणि विठ्ठल भक्तीची गोडी लागण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांनी संत परंपरेचे संस्कार, भक्ती आणि समाजप्रबोधनाचा वारसा जतन करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आगामी आषाढी वारीत वारकरी बांधवांसाठी हे भजनी साहित्य उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भजनी साहित्याचे वाटप होताच संत गजानन महाराज मंदिर परिसर टाळ-मृदंगाच्या गजराने आणि "विठ्ठल... विठ्ठल..."च्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रमात वारकरी बांधव, महिला वारकरी, भजनी मंडळाचे सदस्य तसेच पोफाळी गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे साहेबराव कांबळे, सहसंपर्क प्रमुख चितंगराव कदम, रविकांत रुढे, तालुकाप्रमुख प्रवीण पाटील मिराशे, महिला प्रमुख सुनीता देशमुख, तालुका संघटक कपिल पाटील चव्हाण, गोपीचंद दोडके, संतोष ठाकरे, अरुण ठाकरे, रत्नाकर मुळावाकर, रोहन देशमुख, गणेश खराटे, संदेश ठाकरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकरी संस्कृतीचा सन्मान आणि संत परंपरेचा वारसा जपण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उमरखेड तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात कौतुक होत असून, समाजात भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0