महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन; एल निनो संकटावर फडणवीसांचे निर्देश
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार, जलसंधारण आणि मालगुजारी तलावांवरील अतिक्रमण हटविण्यासह विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रवि वाघमारे
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आगामी ‘एल निनो’च्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आणि महाराष्ट्राला पाणीटंचाईच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीत राज्यातील जलयुक्त शिवार अभियानासह प्रलंबित जलसंधारण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढवणे आणि टँकरग्रस्त भागांना टँकरमुक्त करण्यासाठी कामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी मंत्री संजय राठोड यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. जलयुक्त शिवार, भूजल पुनर्भरण, नाला खोलीकरण तसेच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनांद्वारे पाणीसाठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्व विदर्भातील ऐतिहासिक मालगुजारी तलावांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष धोरण आखून तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. यामुळे या भागातील सिंचन व्यवस्था पुन्हा सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
तसेच, ज्या भागांत तलाव आणि नाला खोलीकरणाची कामे झाली आहेत, त्या परिसरात मृदसंधारणासाठी मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण आणि जमिनीची धूप रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठ्यांचे नियोजन, दुरुस्तीची कामे आणि जलसंधारण प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बैठकीला मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या कामात पारदर्शकता आणि गती आणण्याचे आश्वासन दिले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
