एमएनजीएलच्या घरगुती गॅस पाईपलाईन कामांसाठी प्लंबर्सना मोठी संधी; पिंपरी-चिंचवड महापालिकेत मार्गदर्शन व भरती मेळावा

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या घरगुती पाईपलाईन जोडणी कामांसाठी कुशल प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी येथे विशेष मार्गदर्शन व भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचे एमएनजीएल अधिकाऱ्यांनी सांगितले.

May 30, 2026 - 02:41
 0  3
एमएनजीएलच्या घरगुती गॅस पाईपलाईन कामांसाठी प्लंबर्सना मोठी संधी; पिंपरी-चिंचवड महापालिकेत मार्गदर्शन व भरती मेळावा
एमएनजीएल, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, प्लंबर भरती, पिंपरी चिंचवड

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या घरगुती गॅस पाईपलाईन जोडणी कामांसाठी कुशल प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी येथे विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

एमएनजीएल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत घरगुती पाईपलाईन जोडणीसाठी कुशल प्लंबर्सची गरज असल्याचे कंपनीने सांगत महापालिकेकडे सहकार्याची विनंती केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्लंबर ट्रेडचे आजी व माजी विद्यार्थी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील भविष्यातील करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.

एमएनजीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक वासुदेव गुरसाळी यांनी विद्यार्थ्यांना घरगुती गॅस पाईपलाईन जोडणी कामकाजाची सविस्तर माहिती दिली. इच्छुक प्लंबर्सना एमएनजीएलकडून दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर अनुभवी प्लंबर्सच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष साईटवर काम शिकवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवड झालेल्या प्लंबर्सना एमएनजीएलच्या अधिकृत व्हेंडर्समार्फत काम दिले जाणार आहे. त्यांच्या कामामध्ये एमसीव्ही टू इंस्टॉलेशन, मीटर इंस्टॉलेशन, कॉपर पाईपिंग आणि किचन कन्वर्जन यांसारख्या कामांचा समावेश असेल.

यावेळी गुरसाळी यांनी सांगितले की, भविष्यात सीजीडी (City Gas Distribution) कंपन्यांमध्ये कुशल प्लंबर्सची मागणी झपाट्याने वाढणार असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मेहनत आणि प्रामाणिकपणे काम केल्यास युवक भविष्यात स्वतःचे उद्योजक (Entrepreneur) देखील बनू शकतात. तसेच जॉबवर्कनुसार महिन्याला सुमारे ७० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात संस्थेतील सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याची उत्सुकता दर्शविली असून आगामी काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी या उपयुक्त भरती मेळाव्यासाठी संस्थेचे आभार मानले.

अजून इच्छुक प्लंबर्सनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमादरम्यान एमएनजीएलचे उपप्रबंधक ओम उगले आणि उपप्रबंधक अमोल वैद्य यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन गटनिदेशक शर्मिला काराबळे, गटनिदेशक रवी ओव्हाळ, निदेशक किसन गावडे, निदेशक विक्रम काळोखे आणि निदेशक विशाल रेंगडे यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0