वाल्हेकरवाडीत गौराईचे सोनपावलांनी आगमन; पारंपरिक पद्धतीने उत्साहात स्वागत
वाल्हेकरवाडी येथील सौ. मोहिनी जाधव यांच्या घरी गौराईचे सोनपावलांनी आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने स्वागत, आकर्षक सजावट, विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य आणि महिलांच्या फुगडीने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
वाल्हेकरवाडी येथे गौराई आल्या सोनपावलांनी
पिंपरी : वाल्हेकरवाडी, श्रीपती कॉलनी येथील सौ. मोहिनी जाधव यांच्या घरी गौराईचे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सोनपावलांनी आगमन झाले. गौराईच्या स्वागतासाठी जाधव कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली होती. गौराईचे आगमन होताच महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांना संपूर्ण घर फिरवून घराची ओळख करून दिली. यावेळी घरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
गौराईचे स्वागत करताना महिलांनी पारंपरिक संवाद आणि गाणी म्हणत माहेरवाशीणीच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला. ‘गौरी गौरी कुठे आलात?’ असा प्रश्न विचारल्यानंतर ‘मी माझ्या माहेरी आले’, तसेच ‘गौरी कशासाठी आलात?’ असे विचारल्यावर ‘मी माझ्या पोरा-बाळांसाठी, गाई-वासरांसाठी आले’, ‘गौराई कोणाच्या घरी आली?’ तर ‘धन्याच्या घरी आली’, अशा पारंपरिक ओव्यांमधून गौराईचे स्वागत करण्यात आले.
गौराईचे सोनपावलांनी आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले. गौराईची आकर्षक सजावट आणि साजशृंगार करण्यासाठी सौ. अनिता महाजन, जयश्री विसपुते, तृप्ती ठोंबरे, पूजा सोनवणे आणि पूजा निकुंभ यांनी विशेष परिश्रम घेतले.
यंदाच्या गौराईच्या आरासीत ‘आई कुठे काय करते?’ या लोकप्रिय मराठी मालिकेच्या संकल्पनेची झलक पाहायला मिळाली. संगणकावर काम करणाऱ्या आईपासून ते शेतात कष्ट करणाऱ्या आईपर्यंत विविध भूमिका साकारत महिलाशक्तीचे दर्शन घडविणारा सुंदर देखावा यावेळी सादर करण्यात आला. पारंपरिक संस्कृतीसोबत आधुनिक काळातील महिलांच्या विविध भूमिकांचा सुरेख मेळ या आरासीत साधण्यात आला.
गौराईसमोर करण्यात आलेल्या आरासीत विविध प्रकारचे सुमारे १५ ते २० खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. विविध प्रकारचे लाडू, करंजी, शेव, शंकरपाळे, चिवडा यांसह फराळाचे अनेक पदार्थ जाधव परिवाराने घरच्या घरी तयार केले होते. गौरी पूजनानंतर गौराईला भाजी-भाकरी तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
गौराईचा साजशृंगारही विशेष आकर्षणाचा विषय ठरला. काटपदरच्या आकर्षक साड्या, गळ्यात मोहनमाळ आणि मंगळसूत्र, कमरेला कमरपट्टा, केसात गजरे, हार-वेण्या तसेच पारंपरिक दागिने आणि अलंकारांनी गौराईचे मोहक रूप सजविण्यात आले होते.
सौ. मोहिनी जाधव यांनी विधिवत गौरी पूजन करून आरती केली. यानंतर महिलांनी पारंपरिक गाणी म्हणत आणि फुगडी खेळत गौराईच्या आगमनाचा आनंद साजरा केला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गौराईच्या आगमनाने घराघरात आनंद, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, माहेरवाशीणीच्या स्वागताची ही पारंपरिक परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात असल्याचे चित्र वाल्हेकरवाडीतील श्रीपती कॉलनी येथे पाहायला मिळाले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0