बुलढाणा नगर परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा; पाणीटंचाईवरून प्रशासनाविरोधात तीव्र संताप
बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मधील महिलांनी पाणीटंचाईविरोधात नगर परिषदेवर घागर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अवैध नळ कनेक्शन, पाईपलाईन नियोजनातील त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करण्यात आला.
बुलढाणा प्रतिनिधी : महेंद्र मिश्रा
बुलढाणा शहरातील वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मधील महिलांनी 20 मे रोजी नगर परिषदेवर आक्रमक घागर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले.
महिलांनी थेट नगर परिषद कार्यालय गाठून परिसरात घोषणाबाजी केली. तसेच प्रशासनाच्या कारभाराविरोधात प्रतीकात्मक स्वरूपात घागरी फोडून संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
शहरात पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली दर दोन ते तीन महिन्यांनी पाणीटंचाई निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
अनेक दिवसांपासून नळांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. "घरात पाणी नाही, पण प्रशासन झोपेत आहे," अशा शब्दांत महिलांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
प्रभागातील महिलांनी अवैध नळ कनेक्शन आणि मोटारींच्या वापरामुळे पाण्याचा दाब कमी होत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच प्रशासकांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अवैध नळ कनेक्शन देण्यात आल्याचा दावा करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
"आम्ही 50 वर्षांपासून येथे राहतो; मात्र अशी परिस्थिती यापूर्वी कधी पाहिली नव्हती," अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, वाढीव पाईपलाईन टाकण्याच्या कामात संबंधित ठेकेदारांचे योग्य नियोजन नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला. तसेच नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनादरम्यान काही नागरिकांनी "आंदोलनापेक्षा प्रसिद्धीवर अधिक भर दिला जात आहे का?" असा प्रश्नही उपस्थित केला. मात्र पाणीप्रश्न तातडीने सोडवावा आणि प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिलांनी केली आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
