डॉ. पी. डी. पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे आषाढी एकादशीनिमित्त गौरव

आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे आयोजित दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्काराने गौरविण्यात आले

Jul 26, 2026 - 02:25
 0  4
डॉ. पी. डी. पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे आषाढी एकादशीनिमित्त गौरव
डॉ. पी. डी. पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्कार प्रदान

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २५ जुलै : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे आयोजित भव्य दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. वारकरी, श्रमिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषदेच्या सदस्या उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो वारकरी व श्रमिक उपस्थित होते.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी डॉ. पी. डी. पाटील यांच्या चार दशकांहून अधिक काळातील शैक्षणिक कार्याचा गौरव करताना, "हा पुरस्कार कोणत्याही शासनाचा नाही, तर समाजाचा आहे. त्यामुळे आजपासून डॉ. पी. डी. पाटील हे खऱ्या अर्थाने 'शिक्षणमहर्षी' आहेत," असे गौरवोद्गार काढले. डी. वाय. पाटील संस्थेमुळे हजारो सर्वसामान्य, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, आयटी तज्ज्ञ बनून देश-विदेशात यशस्वी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भोसले यांनी सोशल मीडियावरील पत्रकारांसाठी डी. वाय. पाटील संस्थेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची तसेच पत्रकारांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली.

सत्काराला उत्तर देताना डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, "मी गेली ४५ वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा विस्तार करण्याची संधी मिळाली. आज जागतिक स्तरावर नाव कमावलेल्या संस्थेचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून त्याचे श्रेय माझ्या सहकाऱ्यांना आणि समाजाला आहे." त्यांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि यशवंतभाऊ भोसले यांचे आभारही मानले.

आमदार शंकरराव जगताप यांनी आपल्या मनोगतात डी. वाय. पाटील संस्थेने पिंपरी-चिंचवडची ओळख जागतिक स्तरावर पोहोचविल्याचे सांगितले. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत अनेकांचे जीवन घडविण्याचे कार्य डॉ. पी. डी. पाटील यांनी केले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या दिंडी उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे" या विचाराचा उल्लेख करत, डॉ. पी. डी. पाटील यांनी शिक्षणाची पंढरी उभी करून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले असून, हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे सांगितले. तसेच यशवंतभाऊ भोसले यांनी श्रमिकांच्या सेवेसाठी आयुष्य वाहून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणल्याचे त्यांनी नमूद केले.

आषाढी एकादशीच्या पवित्र वातावरणात झालेला हा सत्कार सोहळा वारकरी भक्ती, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा संगम ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतभाऊ भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश पाटील, दीपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे आणि ओंकार देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0