काळेवाडी कचरा संकलन केंद्राची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणी; सक्षम घनकचरा व्यवस्थापनासाठी दूरदृष्टीचे नियोजन करण्याचे निर्देश
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळेवाडी येथील कचरा संकलन केंद्राची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी पाहणी करून घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आणि भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड, दि. २३ जुलै : स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देत आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी गुरुवारी काळेवाडी येथील एम.एम. कॉलेजजवळील कचरा संकलन केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी शहरातून संकलित होणारा ओला व सुका कचरा, त्याचे वर्गीकरण, वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया आणि अंतिम विल्हेवाट याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी कचरा संकलन केंद्राचा परिसर तसेच आजूबाजूचा भाग स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. परिसरात नियमित स्वच्छता राखून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
शहराचा वेगाने होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता आगामी काळात घनकचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सांगत, त्या अनुषंगाने आतापासूनच दीर्घकालीन आणि सक्षम नियोजन करण्याची गरज असल्याचे अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले. कचरा प्रक्रिया यंत्रणा अधिक गतिमान, आधुनिक आणि परिणामकारक करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बारणे म्हणाले, "स्वच्छ शहर, सक्षम नियोजन आणि पर्यावरणपूरक भविष्य हीच महापालिकेची दिशा आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील."
या पाहणीमुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, तसेच थेरगाव आणि काळेवाडी परिसरातील नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0