नवी दिल्लीतील ‘मऱ्हाटी एम्पोरियम’चा कायापालट होणार; महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि उत्पादनांना मिळणार जागतिक व्यासपीठ – उदय सामंत

नवी दिल्लीतील महाराष्ट्राच्या ‘मऱ्हाटी एम्पोरियम’चा सर्वांगीण विकास करून ते महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती, हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांचे आधुनिक ‘अनुभूती केंद्र’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Jul 23, 2026 - 21:13
 0  7
नवी दिल्लीतील ‘मऱ्हाटी एम्पोरियम’चा कायापालट होणार; महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि उत्पादनांना मिळणार जागतिक व्यासपीठ – उदय सामंत
उदय सामंत, मऱ्हाटी एम्पोरियम, Marhati Emporium, New Delhi, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ

नवी दिल्ली | प्रतिनिधी नरेश शिंदे 

नवी दिल्लीतील महाराष्ट्राचे ‘मऱ्हाटी एम्पोरियम’ अधिक आधुनिक, आकर्षक आणि सर्वसमावेशक स्वरूपात विकसित करून ते महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि स्थानिक उत्पादनांचे भव्य ‘अनुभूती केंद्र’ म्हणून उभारण्याचा निर्णय राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ लिमिटेडच्या अखत्यारीतील मऱ्हाटी एम्पोरियमला सदिच्छा भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेऊन विकास आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

ग्रामीण कारागीर आणि महिला बचत गटांना मिळणार जागतिक बाजारपेठ

यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, नवी दिल्ली हे देशाचे केंद्रस्थान असून येथे देश-विदेशातील पर्यटक, उद्योजक आणि व्यापारी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण कारागीर, महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

एम्पोरियमच्या नूतनीकरणामुळे महाराष्ट्रातील पारंपरिक उत्पादनांना दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेत नवे स्थान मिळेल आणि स्थानिक कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘अनुभूती केंद्र’ म्हणून होणार विकास

उद्योगमंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितले की, एम्पोरियम केवळ विक्री केंद्र न राहता महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवणारे ‘अनुभूती केंद्र’ म्हणून विकसित करण्यात यावे.

या दालनात महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैठणी, हातमागावरील वस्त्रे, कोल्हापुरी चप्पल, वारली चित्रकला, हस्तकलेच्या विविध वस्तू तसेच गृहउद्योगांतून तयार होणारे स्थानिक खाद्यपदार्थ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इतर राज्यांच्या एम्पोरियमचा अभ्यास

या विकास आराखड्याची आखणी करताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काश्मीर, गुजरात आणि बिहार राज्यांच्या एम्पोरियमना भेट देऊन तेथील डिझाइन, सादरीकरण आणि विपणन पद्धतींचा अभ्यास केला.

यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ लिमिटेडच्या महाव्यवस्थापक संगीता वराडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, कंपनी सेक्रेटरी अक्षय पाठक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नूतनीकरणानंतर ‘मऱ्हाटी एम्पोरियम’ हे महाराष्ट्राच्या कला, संस्कृती, परंपरा आणि स्थानिक उत्पादनांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रभावी प्रदर्शन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.