शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी Farmer ID, आधार प्रमाणीकरण आणि Agristack नोंदणी अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले.

Jul 22, 2026 - 22:11
 0  7
शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Farmer ID, शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026, गडचिरोली, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, Agristack, कर्जमाफी,

गडचिरोली | प्रतिनिधी नरेश शिंदे 

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळण्यासाठी Farmer ID (फार्मर आयडी), आधार प्रमाणीकरण आणि Agristack प्रणालीवरील नोंदणी अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप Farmer ID नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने शासन सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार बँकांकडून प्राप्त कर्जमाहितीच्या आधारे लाभ मंजूर केला जाणार आहे.

योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित पीक कर्जधारक पात्र शेतकऱ्यांनाही शासनाच्या नियमांनुसार लाभ मिळू शकणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार एकरकमी समझोता (OTS) योजनेचाही लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याशिवाय सन २०२३-२४ किंवा २०२४-२५ या वर्षांतील अल्पमुदत पीक कर्जाची नियमानुसार संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष परतफेड केलेल्या रकमेच्या आधारे हा लाभ मंजूर केला जाणार आहे.

कर्जमाफी संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत राहणार असून पात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींचे नियमानुसार निराकरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, तहसील कार्यालय तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद मेश्राम यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळावा यासाठी Farmer ID नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1