गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार; पणन मंत्री जयकुमार रावल
जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबतच्या सामंजस्य करारामुळे गडचिरोलीला ग्रीन स्टील उत्पादनाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न; रोजगार व कौशल्य विकासाला चालना.
मराठवाडा ब्यूरो: लक्ष्मण चौरे
जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत सामंजस्य करार; अत्याधुनिक हरित तंत्रज्ञान, गुंतवणूक, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्याचा राज्य शासनाचा निर्धार
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यास नवी दिशा देणारा आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत करण्यात आलेला सामंजस्य करार (MoU) हा केवळ औद्योगिक गुंतवणुकीचा करार नसून गडचिरोलीला ग्रीन स्टील उत्पादनाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी संकल्पाचा पाया आहे, असे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
या करारासंदर्भात आयोजित बैठकीत जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. फ्रेडरिक मार्टिन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन तसेच राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे आदी उपस्थित होते.
गडचिरोलीत औद्योगिक परिवर्तनाला चालना
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि शाश्वत औद्योगिक विकासाला चालना देणारे अव्वल राज्य आहे.
राज्याचा विकास केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित नसून सर्वसमावेशक आणि संतुलित प्रादेशिक विकासावर आधारित आहे. गडचिरोलीतील हा उपक्रम केवळ नवीन उद्योग उभारण्यापुरता मर्यादित राहणार नसून, संपूर्ण जिल्ह्याच्या औद्योगिक परिवर्तनाचा पाया ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोजगार आणि कौशल्य विकासाच्या नव्या संधी
या प्रकल्पामुळे गडचिरोली परिसरात अत्याधुनिक हरित तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे. विशेषतः स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि कौशल्याधारित नव्या संधी निर्माण होतील, असे रावल यांनी सांगितले.
विदर्भातील नैसर्गिक आणि खनिज संपत्तीला पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रियेची जोड देऊन जबाबदार औद्योगिक विकासाचे आदर्श मॉडेल उभारण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हरित पोलाद उत्पादनाला जागतिक बाजारपेठेची जोड
महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक व प्रवासी भारतीय संपर्क विभागाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय औद्योगिक भागीदारी अधिक मजबूत करण्यात येत आहे.
जॉन कॉकरिलसोबतची ही भागीदारी महाराष्ट्राला हरित पोलाद उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर नवे स्थान मिळवून देण्यास मदत करेल, असे मंत्री रावल यांनी नमूद केले.
४ सप्टेंबरला सामंजस्य कराराची औपचारिक देवाणघेवाण
४ सप्टेंबर रोजी बेल्जियमच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत या सामंजस्य कराराची औपचारिक देवाणघेवाण होणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र आणि जॉन कॉकरिल यांच्यातील सहकार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे बळ आणि प्रतिष्ठा मिळणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.
या भागीदारीमुळे महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला जागतिक मान्यता मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योगपूरक वातावरणासाठी शासनाकडून आवश्यक सुविधा
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या, धोरणात्मक प्रोत्साहन, सुलभ सुविधा आणि उद्योगपूरक परिसंस्था उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार असून, उद्योगाच्या गरजांनुसार स्थानिक मनुष्यबळाला सक्षम करण्याचे प्रयत्न केले जातील, असेही रावल यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीची नवी ओळख निर्माण करण्याचे उद्दिष्ट
गडचिरोलीची ओळख केवळ नैसर्गिक संपत्तीपुरती मर्यादित न राहता ग्रीन स्टील, नवोपक्रम आणि शाश्वत उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून निर्माण व्हावी, ही राज्य शासनाची स्पष्ट दृष्टी असल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले.
महाराष्ट्र नैसर्गिक संसाधनांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे, पारंपरिक उद्योगांपासून हरित उद्योगांकडे आणि देशांतर्गत उत्पादनापासून जागतिक निर्यातक्षमतेकडे वाटचाल करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.
जॉन कॉकरिलचे आभार
गडचिरोलीमध्ये हरित औद्योगिक विकासाच्या या संकल्पनेसाठी महाराष्ट्रावर विश्वास दाखवल्याबद्दल पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडचे आभार मानले.
या भागीदारीमुळे गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भाच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0