गडचिरोलीतील शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

गडचिरोली जिल्ह्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत विविध शाळांना भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Sep 10, 2026 - 21:23
 0  8
गडचिरोलीतील शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – शिक्षणमंत्री दादाजी भुसे
दादाजी भुसे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, गडचिरोली शिक्षण, गडचिरोली शाळा, शालेय पायाभूत सुविधा, चला शाळेत जाऊया अभियान, शालेय शिक्षण, विद्यार्थी, शिक्षक, शाळा विकास, पायाभूत सुविधा निधी, पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, केंद्रप्रमुख पदोन्नती, विद्यार्थी सुरक्षा, आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

गडचिरोली, दि. १० सप्टेंबर (जिमाका) : शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीमध्ये राष्ट्रभक्ती आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजविणे आवश्यक आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत निष्ठेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध असून शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी केली. त्यानंतर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी संजय आसवले, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजगारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

लोकसहभागातून शाळांचा विकास करा

गावात मंदिर उभारणी आणि विकासासाठी ज्या पद्धतीने संपूर्ण गाव एकत्र येते, त्याचप्रमाणे शाळा हे ज्ञानमंदिर मानून तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुढे यावे, असे आवाहन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद शाळांचे चित्र सकारात्मकरीत्या बदलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षक प्रतिकूल परिस्थितीतही निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

जीर्ण व धोकादायक शालेय इमारतींचे तातडीने निर्लेखन

शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पुरेशा वर्गखोल्या, क्रीडांगण, ई-लॅब आणि वाचनालय यांसारख्या मूलभूत व शैक्षणिक सुविधा दर्जेदार असाव्यात, असे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले.

जिल्हा नियोजन समिती, सीएसआर निधी तसेच मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

शाळा परिसरातील जीर्ण, निरुपयोगी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या जुन्या इमारतींचे तातडीने निर्लेखन करून आवश्यकतेनुसार नवीन इमारतींचे प्रस्ताव आणि आराखडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती

राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून, लवकरच रिक्त जागांवर शिक्षक रुजू होतील. त्यामुळे शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होईल, असे दादाजी भुसे यांनी सांगितले.

तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांना प्रत्यक्ष भेटी

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी रामनगर येथील पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, आरमोरी रोडवरील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल, श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल गोगाव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आयएसओ आदर्श शाळा बोदली येथे प्रत्यक्ष भेटी दिल्या.

या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शाळेत काय शिकवले जाते, शिक्षक कोणत्या पद्धतीने अध्यापन करतात, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि आणखी कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे, याबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांनीही शिक्षणमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला.

पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, रामनगर येथे विद्यार्थ्यांचे वाचन आणि कविता गायन ऐकून शिक्षणमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. वर्गखोल्यांची कमतरता दूर करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोगाव येथे शिक्षणमंत्र्यांनी वृक्षारोपण केले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासोबतच स्वच्छतागृहांसह शाळेतील मूलभूत सुविधांची पाहणी केली.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आयएसओ आदर्श शाळा, बोदली येथे विद्यार्थ्यांसोबत पोळा सण साजरा करून त्यांनी संवाद साधला. विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले. डिजिटल वर्ग आणि संगणक लॅबची पाहणी करून नादुरुस्त पॅनेल तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.

शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आलेल्या वॉल कंपाउंड, शेड तसेच पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनासंदर्भातील मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा गौरव

सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध परीक्षा, विज्ञान, क्रीडा आणि अन्य स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच उपक्रमशील शिक्षकांचा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

इस्रो शैक्षणिक सहल : बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे शैक्षणिक भेट देणाऱ्या मोहुली मॉडेल स्कूलच्या विद्यार्थिनी सन्ना शकील पठाण हिने इस्रो भेटीचा तसेच प्रथमच केलेल्या विमानप्रवासाचा अनुभव मनोगतातून व्यक्त केला.

‘इन्स्पायर अवॉर्ड’ : आदर्श इंग्लिश हायस्कूल, देसाईगंज येथील ध्रुव विनोद कोवे याचा नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी विशेष सत्कार करण्यात आला.

राज्य विज्ञान मेळावा : राज्य विज्ञान मेळाव्यात द्वितीय पारितोषिक मिळविणाऱ्या नमन पेदापल्लीवार (इंदिरा गांधी विद्यालय, येनापूर) याचा सन्मान करण्यात आला.

क्रीडा आणि स्काऊट-गाईडमधील गुणवंतांचा सन्मान

राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आभा सांग्रामे, खो-खो खेळाडू ध्रुव हलामी, राष्ट्रीय कबड्डीपटू श्रवण उसेंडी, कराटेपटू सार्थक गेडाम, वनिता पुंगाटी, तसेच सलोनी करपे, वंशिका झांझाळ, कृष्णा नेरकर, रोशन काटवे आणि रमेश बन्सी या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

NMMS, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

NMMS परीक्षेत यश मिळविणाऱ्या वैष्णवी राऊत, स्वीटी उसेंडी, कृतिका गुरुनुले, प्रांजल भोयर यांच्यासह नवोदय आणि विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पूर्वा विनोद मडावी आणि श्वेता वासुदेव गेडाम यांचाही गौरव करण्यात आला.

आदर्श आणि तंत्रस्नेही शिक्षकांचा गौरव

प्रयोगशील शिक्षक दिलीप नाकाडे, मांगरमेंढा शाळेचे प्रवीण दोलीकर यांच्यासह जिल्ह्यातील उपक्रमशील आणि तंत्रस्नेही ‘आयडॉल शिक्षकां’चा शाल व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाच्या पायाभूत सुविधा, शिक्षकांची निष्ठा, पालकांचा सहभाग आणि समाजाच्या लोकसहभागाचा समन्वय महत्त्वाचा ठरणार असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.