खमंचेरू आश्रमशाळेला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशयांत पंडा यांनी खमंचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मूलभूत सुविधा, स्वच्छता व सुरक्षेचा आढावा घेत तातडीने उपाययोजनांचे निर्देश दिले.

Aug 26, 2026 - 23:19
 0  4
खमंचेरू आश्रमशाळेला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद
खमंचेरू आश्रमशाळा, गडचिरोली जिल्हाधिकारी, अविशयांत पंडा, आश्रमशाळा, विद्यार्थ्यांच्या समस्या, शैक्षणिक सुविधा, प्रशांत धाम देवस्थान, चपराळा, गडचिरोली

प्रतिनिधी : राजेंद्र किलनाके 

गडचिरोली, दि. 26 ऑगस्ट: जिल्हाधिकारी अविशयांत पंडा यांनी अहेरी तालुक्यातील खमंचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा तसेच सुरक्षाविषयक उपाययोजनांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील वसतिगृह, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह तसेच संपूर्ण परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत का, खिडक्यांना डास, कीटक तसेच इतर जीवांपासून संरक्षणासाठी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत का, परिसरात स्वच्छता राखली जाते का आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत का, याची त्यांनी बारकाईने तपासणी केली.

विद्यार्थ्यांकडून जाणून घेतल्या अडचणी

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या दैनंदिन गरजा आणि अडचणी जाणून घेण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भर दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर, अतिरिक्त खाटा तसेच बसण्यासाठी आवश्यक बेंच उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या मागण्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ नोंद घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश

आश्रमशाळेच्या सुंदर इमारतीचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. मात्र, वसतिगृह तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित आवश्यक दुरुस्तीची कामे प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हाती घ्यावीत, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

चपराळा येथील प्रशांत धाम देवस्थानाची पाहणी

आश्रमशाळेच्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी अविशयांत पंडा यांनी चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील हनुमान मंदिर व प्रशांत धाम देवस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेतला.

भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, परिसराचा विकास आणि सुशोभीकरणाची कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांबरोबरच चपराळा परिसरातील विकासकामांनाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.