आषाढी एकादशीनिमित्त नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव येथे विद्यार्थ्यांनी साकारला भक्तिमय वारी सोहळा
आषाढी एकादशीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी आणि पारंपरिक वारी सोहळा उत्साहात साजरा केला.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. २५ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारी सोहळा, वृक्ष दिंडी आणि ग्रंथ दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करून वारकरी परंपरेचा भक्तिमय अनुभव साकारला. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रथावर भगवान पांडुरंग, माता रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत मुक्ताबाई यांची वेशभूषा परिधान करून आकर्षक देखावे सादर केले. पारंपरिक पोशाखातील कलश पथक, लेझीम पथक, टाळ पथक आणि पताका पथकाने "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड नामघोषात गावातून भव्य मिरवणूक काढली.
यानंतर शाळेच्या पटांगणात टाळ, मृदंग आणि लेझीमच्या तालावर वारकरी परंपरेतील रिंगण सोहळा उत्साहात साकारण्यात आला. माध्यमिक व प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी या भक्तिमय सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. भिमराव बोढारे, पर्यवेक्षिका सौ. वै. र. गायकवाड, शालेय समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील, संस्था सदस्य श्री. म्हसुकाका पोटे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण देवरे, श्री. अनिल पोटे, श्री. अशोक गवळी यांच्यासह माध्यमिक व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकरी परंपरेतील भक्ती, संस्कार आणि सामाजिक मूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देतानाच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष दिंडी आणि ज्ञानार्जनाचे महत्त्व अधोरेखित करणारी ग्रंथ दिंडी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्याविषयी आदर, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0