सांगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय देशातील अव्वल उपचार केंद्र ठरेल; गडहिंग्लजमध्ये आयुर्वेद एम्स उभारण्याचा संकल्प – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्ह्यातील सांगाव येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालयाचे लोकार्पण झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे रुग्णालय देशातील सर्वोत्तम उपचार केंद्र ठरेल, तसेच गडहिंग्लज येथे आयुर्वेद एम्स व फिजिओथेरपी सेंटर उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.

Jul 23, 2026 - 00:22
 0  8
सांगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय देशातील अव्वल उपचार केंद्र ठरेल; गडहिंग्लजमध्ये आयुर्वेद एम्स उभारण्याचा संकल्प – मंत्री हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, सांगाव आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद रुग्णालय, कोल्हापूर मेडिकल हब,

कोल्हापूर | प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव येथे उभारण्यात आलेले शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय उपचार सेवांच्या बाबतीत देशातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. सांगाव येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, कागल नगराध्यक्ष सविता माने, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी डॉ. अजय पाटणकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गडहिंग्लजमध्ये आयुर्वेद एम्स आणि फिजिओथेरपी सेंटरचा संकल्प

यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथे केंद्र सरकारच्या सहकार्याने आयुर्वेद एम्स आणि अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आयुर्वेद उपचारांचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर होणार मेडिकल हब

कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयाचे नूतनीकरण, शेंडा पार्क येथील आरोग्य प्रकल्प आणि सांगाव येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यामुळे कोल्हापूर हे राज्यातील महत्त्वाचे 'मेडिकल हब' म्हणून उदयास येईल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, या सुविधांमुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक आणि गोवा सीमाभागातील रुग्णांनाही अत्याधुनिक उपचारांसाठी कोल्हापूरला येणे सोयीचे होईल. भविष्यात उपचारांसाठी बंगळुरूकडे जाण्याऐवजी रुग्ण कोल्हापूरची निवड करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२४० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला वेग

सुमारे २४० कोटी रुपये खर्चून १२ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सातबारा उतारा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी तो वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजीत अहिरे यांच्याकडे सुपूर्द केला.

मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी सुरू करण्याचे निर्देश

मंत्री मुश्रीफ यांनी ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य कागल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कागल नगरपालिकेने आतापासूनच सर्व तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्यशैलीचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या लोकार्पण सोहळ्यास माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, चंद्रकांत गवळी, अस्लम मुजावर, प्रवीण काळबर, अर्जुन नाईक, संजय चितारी, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ, महेश चौगुले, महाविद्यालयाचे विभागप्रमुख, डॉक्टर, नर्सेस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून, आयुर्वेद उपचार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला नवी दिशा मिळणार असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.