कामगारांना वैद्यकीय सेवा देण्यात कुचराई झाल्यास कडक कारवाई करणार – प्रकाश आबिटकर
कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. वैद्यकीय सेवेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रतिनिधी: उमेश जाधव
राज्यातील सर्व ईएसआयएस रुग्णालयांना दर्जेदार आणि अत्याधुनिक सुविधा देणार
कोल्हापूर, दि. ११ (जिमाका) : औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्य कामगार विमा सोसायटीच्या सेवा दवाखाने तसेच ईएसआयएस रुग्णालयांमधून दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक आहे. कामगारांना वैद्यकीय सेवा देण्यात कोणत्याही प्रकारची कुचराई किंवा हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई (ईएसआयएस) अंतर्गत कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकणंगले (मॅक) येथील सेवा दवाखान्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कामगारांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यावर भर
पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना राज्य कामगार विमा सोसायटीच्या सेवा दवाखान्यातून चांगल्या दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत.
या अनुषंगाने गणेशोत्सवानंतर केंद्र व राज्य शासनाचे संबंधित अधिकारी, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व ईएसआयएस रुग्णालयांचा दर्जा उंचावणार
राज्यातील प्रत्येक ईएसआयएस रुग्णालयाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासोबतच तेथे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांसाठीचे अर्थसाहाय्य वाढविण्यासाठीही शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
मात्र, नवीन सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय सेवाही दर्जेदार पद्धतीने दिल्या पाहिजेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
रुग्णालयांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश
ईएसआयएस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयांच्या कामकाजाकडे नियमित लक्ष द्यावे आणि वेळोवेळी रुग्णालयांची तपासणी करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
कामगारांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व आवश्यक सेवा आणि सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
ईएसआयएस रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या विमाधारक रुग्णांची संख्या वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांचा आढावा
बैठकीदरम्यान पालकमंत्री आबिटकर यांनी सेवा दवाखाने आणि ईएसआयएस रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, विविध सेवा-सुविधा आणि रुग्णसंख्या याबाबत ईएसआयएस, कामगार विभागाचे अधिकारी तसेच कामगार प्रतिनिधींकडून माहिती घेतली.
रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
वैद्यकीय तज्ज्ञ, रक्तसाठा आणि अद्ययावत उपकरणांची मागणी
मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांनी प्रास्ताविक केले. केईएचे अध्यक्ष कमलकांत कुलकर्णी यांनी कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध सुधारणा सुचवल्या.
रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून त्यासोबतच पुरेसे वैद्यकीय तज्ज्ञ नियुक्त करावेत, रक्तसाठा उपलब्ध ठेवावा आणि अद्ययावत वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयांमधून चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बैठकीला विविध मान्यवरांची उपस्थिती
यावेळी माजी आमदार जयश्री जाधव, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक अशोक थोरात, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले, केईएचे अध्यक्ष कमलकांत कुलकर्णी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, वैद्यकीय प्रशासन अधिकारी निर्मलकुमार नेमाणे, ईएसआयसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल कुमार व डॉ. रवींद्र पवार, कोल्हापूरचे सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, इचलकरंजीच्या सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे, मॅकचे सचिव शंतनू गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि राज्य विमा योजनेच्या लोकल कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0