धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर गोरेगावात विद्यार्थ्यांच्या विजयाचा जल्लोष; क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून फटाक्यांची आतषबाजी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
हिंगोली प्रतिनिधी भगवानराव मस्के
हिंगोली, दि. २५ जुलै : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजीत दिपके यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे देशाचे लक्ष वेधले गेले. या सातत्यपूर्ण संघर्षामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण झाला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
संघटनेने यापूर्वीही हिंगोली येथे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या निषेधार्थ 'जोडे मारो' आंदोलन, पुतळा जाळण्याचा प्रयत्न तसेच विविध लोकशाही मार्गाने आंदोलने करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला होता.
गोरेगाव येथे झालेल्या आनंदोत्सवात "हा आंदोलनाचा विजय आहे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या संघर्षाला हे यश समर्पित असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, राहुल कावरखे, अमोल जाधव, अमोल एकशिंगे, रामेश्वर कावरखे, अलीम भाई, कोंडबाराव खटके यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, "संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या एकजुटीने आणि लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला. हा विजय देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे." अशी भावना उपस्थितांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या लढ्याला शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0