एलआयसी पॉलिसीच्या बहाण्याने शिक्षिकेची निर्घृण हत्या; मालमत्ता हडपण्यासाठी कट रचणाऱ्या चौघांचा पर्दाफाश
एलआयसी पॉलिसीच्या बहाण्याने 53 वर्षीय शिक्षिकेची हत्या करून मालमत्ता हडपण्याचा कट उघडकीस. ठाणे गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
ठाणे | प्रतिनिधी : देवानंद शिंदे
एलआयसी पॉलिसी काढण्याच्या बहाण्याने एका ५३ वर्षीय अविवाहित शिक्षिकेची अमानुष हत्या करून तिची मालमत्ता बळकावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून आणखी दोन साथीदारांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता मारुती चंदनशिवे (वय ५३) या ठाणे जिल्ह्यातील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्या शिक्षिका तसेच एलआयसी एजंट म्हणून कार्यरत होत्या. १४ जुलै २०२६ रोजी त्या एलआयसीच्या कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या, मात्र परत न आल्याने त्यांच्या भावाने १५ जुलै रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान १६ जुलै रोजी नाशिक येथील सिन्नर–घोटी मार्गावरील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याचवेळी ठाणे गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू ठेवत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
तपासात दिगंबर भागुजी आव्हाड (वय ४८) आणि तुषार मुरलीधर रत्नपारखी (वय ५२) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आणखी दोन साथीदारांसह संगनमत करून शिक्षिकेला एलआयसी पॉलिसीच्या बहाण्याने आसनगाव येथे बोलावल्याची कबुली दिली. आरोपींनी तिच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर मृत्यूनंतर वारसदार म्हणून स्वतःची नावे नोंदविण्याचा कट रचला होता. त्यासाठी शिक्षिकेला मारहाण करून जबरदस्तीने कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या आणि नंतर तिचे नाक व तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह नाशिक मार्गावर टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणात दोन आरोपींना पुढील कारवाईसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. तपासात मालमत्ता हडप करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध कट रचल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कल्याण युनिटने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1