खामगावात किरकोळ वादानंतर दगडफेक; निर्मल टर्निंग परिसरात तणावपूर्ण वातावरण
खामगाव येथे हॉर्न वाजवणे आणि किरकोळ धक्काबुक्कीच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन निर्मल टर्निंग परिसरात दगडफेकीची घटना घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी - महेंद्र मिश्रा बुलढाणा
खामगाव शहरात गुरुवारी अचानक तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच उग्र बनत दोन्ही गटांतील युवकांमध्ये दगडफेक झाल्याची घटना निर्मल टर्निंग परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक किराणा सामान घेऊन दुचाकीवरून जात असताना निर्मल टर्निंग येथील मशिदीजवळ दुसऱ्या युवकाला हलका धक्का लागला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच दोन्ही बाजूंचे युवक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशन तसेच खामगाव शहर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच श्रेणिक लोढा यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले असून सध्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, “हॉर्न वाजवणे देखील आता गुन्हा झाला का?” अशी चर्चा शहरात रंगताना दिसत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

