आषाढी एकादशीनिमित्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याला अनोखी मानवंदना; नाशिकच्या शिक्षकाचे आकर्षक फलक रेखाटन

आषाढी एकादशीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जनहितकारी कार्याला मानवंदना देणारे आकर्षक फलक रेखाटले आहे.

Jul 25, 2026 - 19:38
 0  6
आषाढी एकादशीनिमित्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याला अनोखी मानवंदना; नाशिकच्या शिक्षकाचे आकर्षक फलक रेखाटन
आषाढी एकादशीनिमित्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याला अनोखी मानवंदना;

नाशिक ब्यूरो:

नाशिक, दि. २५ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाला आणि जनसेवेच्या मूल्यांना उजाळा देणारे एक आकर्षक फलक रेखाटन नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या दर्शनी भागावर साकारण्यात आले आहे. हे रेखाटन शाळेचे कलाशिक्षक देव हिरे यांनी केले असून, त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

या फलकामध्ये आषाढी एकादशीचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा पवित्र उत्सव असून, लाखो वारकरी "ज्ञानोबा-तुकाराम"चा गजर करत पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. संत परंपरेने समाजाला सत्य, समता, मानवता, प्रेम आणि जनसेवेचा संदेश दिला असून, "जनतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा" हा विचार या फलकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

फलकावर महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तथा वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या जनहितकारी कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत त्यांनी नियमांची कठोर अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाया केल्याचे या संदेशातून नमूद करण्यात आले आहे.

"जनतेसाठी निःस्वार्थपणे काम करणारे तुकाराम मुंढे हेच आधुनिक काळातील खरे 'तुकाराम' आहेत. राज्याला असेच कर्तव्यदक्ष, सच्चे आणि प्रामाणिक अधिकारी लाभोत," अशी प्रार्थना विठ्ठल चरणी व्यक्त करण्यात आली आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती, समाजसेवा आणि प्रामाणिक प्रशासनाचा संदेश देणारे हे फलक रेखाटन नागरिकांसह वारकरी आणि विद्यार्थ्यांचेही विशेष लक्ष वेधून घेत असून, सामाजिक जनजागृतीचा प्रभावी संदेश देत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0