महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा दिल्लीकरांच्या भेटीला; महाराष्ट्र सदनातील तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ (महाटेक्स) आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात महाराष्ट्राच्या पारंपरिक हातमाग व रेशीम उत्पादनांची विक्री करण्यात येत आहे.
नवी दिल्ली | प्रतिनिधी नरेश शिंदे
महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि. १८) महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित (महाटेक्स), नागपूर आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत या विशेष प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे, रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, अशोक वडवले, महाटेक्सचे गणेश ठाकूर आणि रूपेश खापेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी दिल्लीतील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन महाराष्ट्रातील विणकर, कारागीर आणि स्वयं-सहायता गटांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने थेट खरेदी करावीत तसेच 'व्होकल फॉर लोकल' संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन केले.
प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे नुकत्याच पार पडलेल्या 'भारत टेक्स २०२६' प्रदर्शनात महाराष्ट्राच्या दालनाला देश-विदेशातील खरेदीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच धर्तीवर या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विणकर आणि कारागिरांनी तयार केलेली उत्पादने दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रवारशाचा व्यापक प्रचार व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेचा समृद्ध वारसा अनुभवता येणार आहे. अस्सल पैठणी, करवत काठी साड्या, पारंपरिक हिमरू, खण, सोलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू व टेरी टॉवेल्स तसेच जीआय (GI) टॅग प्राप्त कोल्हापुरी चपला यांसह विविध हातमाग आणि रेशीम उत्पादने थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.
हे विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शन १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची आणि दर्जेदार उत्पादने थेट खरेदी करण्याची संधी दिल्लीकरांना उपलब्ध झाली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0