अवैध दारू तस्करांवर दराटी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक; ४२० देशी दारूच्या बाटल्यांसह ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ जिल्ह्यातील दराटी पोलिसांनी ढाणकी ते कुरळी मार्गावर कारवाई करत ४२० देशी दारूच्या बाटल्या, दुचाकीसह ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी मिलिंद दत्ता कदम याला अटक करण्यात आली.
यवतमाळ | प्रतिनिधी : रवी वाघमारे
ग्रामीण भागातील अवैध दारू तस्करीला आळा घालण्यासाठी दराटी पोलिसांनी सोमवारी पहाटे धडक कारवाई करत मोठे यश मिळवले. ढाणकी येथून कुरळी गावाकडे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तस्कराला रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईत ४२० देशी दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, ढाणकी परिसरातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची तस्करी होणार आहे. माहितीची खातरजमा करून दराटी पोलिसांनी कुरळी मार्गावर सापळा रचत नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पदरीत्या वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान दुचाकीवर लपवून ठेवलेल्या ४२० देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ दारूचा साठा आणि दुचाकी जप्त करत मिलिंद दत्ता कदम (वय ३२, रा. ढाणकी) याला अटक केली. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई ठाणेदार गोपाळ इंद्राळे यांच्या मार्गदर्शनाखाली दराटी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले असून, अवैध धंदे करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
ग्रामीण भागात वाढत्या अवैध दारू तस्करीविरोधात दराटी पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1