वृद्ध कलावंतांचा उपोषणाचा एल्गार; निवड प्रक्रियेच्या चौकशीची रिपाई जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांची मागणी

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील कथित अनियमिततेविरोधात यवतमाळमध्ये वृद्ध कलावंतांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. रिपाईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन निष्पक्ष चौकशीची मागणी करत प्रशासनाला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

वृद्ध कलावंतांचा उपोषणाचा एल्गार; निवड प्रक्रियेच्या चौकशीची रिपाई जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांची मागणी
यवतमाळ वृद्ध कलावंत आंदोलन, कलावंत मानधन योजना, राजर्षी शाहू महाराज योजना, महेंद्र मानकर, रिपाई यवतमाळ, कलावंत उपोषण, ज्येष्ठ साहित्यिक, कलाकार मानधन, भीमगीते, रमाईगीते, अण्णाभाऊ साठे पोवाडे, आंबेडकरी प्रबोधन, यवतमाळ बातम्या

यवतमाळ  प्रतिनिधी : रवि वाघमारे 

यवतमाळ | जिल्हा प्रतिनिधी रवि वाघमारे : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेच्या निवड प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत यवतमाळ जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलावंत, वारकरी सेवा विकास व सन्मान संस्था (म.रा.) तसेच अन्यायग्रस्त कलावंत आणि साहित्यिकांच्या वतीने २ ऑक्टोबरपासून जिल्हा परिषद परिसरात भजन-गायन आंदोलनासह बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनस्थळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या कलावंतांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

चार वर्षांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२२-२३ ते २०२५-२६ या सलग चार वर्षांच्या निवड प्रक्रियेत भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ आदी विविध कलाप्रकारांतील कलावंतांना स्थान देण्यात आले. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भीमगीते, रमाईगीते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे तसेच आंबेडकरी प्रबोधन सादर करणाऱ्या काही कलावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुलाखतीच्या वेळी अशा कलावंतांना गुण देण्यात आले नसल्याची तक्रारही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे मागील चार वर्षांतील निवड प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

केंद्रीय मंत्र्यांना दिले होते निवेदन

दरम्यान, २० ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या यवतमाळ दौऱ्यादरम्यान वंचित कलावंतांनी त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रशासकीय बैठकीतही हा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) युवराज मेहेत्रे यांनी वगळलेल्या कलावंतांचा यादीत समावेश करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मात्र, अद्याप या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नसल्याने कलावंतांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

महेंद्र मानकर यांचा प्रशासनाला इशारा

रिपाईच्या वतीने यापूर्वी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निवड प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने वृद्ध कलावंतांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे महेंद्र मानकर यांनी सांगितले.

उपोषणस्थळी कलावंतांशी संवाद साधताना मानकर म्हणाले की, आयुष्यभर गावोगावी महापुरुषांचे विचार आपल्या कलेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या कलावंतांनाच वृद्धापकाळात न्यायासाठी उपोषण करावे लागत असल्याची परिस्थिती गंभीर आहे. दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जुन्या याद्यांची चौकशी करून नव्याने निवड करण्याची मागणी

शाहू महाराजांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेत पात्र कलावंतांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. गेल्या चार वर्षांतील निवड याद्यांची निष्पक्ष चौकशी करावी, वगळण्यात आलेल्या पात्र कलावंतांचा तातडीने यादीत समावेश करावा किंवा विद्यमान मंजूर यादी रद्द करून नव्याने निष्पक्ष मुलाखती घेऊन नवीन यादी तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच भविष्यात प्रबोधनात्मक कलाप्रकारांना योजनेमध्ये स्वतंत्र आणि न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

उपोषणकर्त्या वृद्ध कलावंतांच्या प्रकृतीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी महेंद्र मानकर यांनी केली. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास रिपाई (आठवले) अन्यायग्रस्त कलावंतांना सोबत घेऊन प्रत्येक तालुक्यात आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी गोविंद मेश्राम, अनिल डाकोरे, नवनीत महाजन, अंकुश महाले, प्रवीण नरोटे यांच्यासह मोठ्या संख्येने कलावंत आणि कार्यकर्ते उपस्थित होते.