नागपुरात उभारत आहेत देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटर; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी

नागपूरच्या दाभा येथे उभारण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटरच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. अत्याधुनिक सुविधा, २ हजार आसनक्षमतेचे सभागृह आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे नागपूरला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Jul 12, 2026 - 03:11
 0  6
नागपुरात उभारत आहेत देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटर; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी
नागपूर, ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटर, इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर

प्रतिनिधी | देवानंद शिंदे 

नागपूर: नागपूरच्या दाभा परिसरात उभारण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटरच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत हे केंद्र नागपूरला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कृषी प्रदर्शनांसोबतच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, परिषद व व्यावसायिक कार्यक्रमांसाठी हे कन्व्हेंशन सेंटर महत्त्वाचे ठरणार असून नागपूर शहराच्या विकासाला मोठी चालना मिळेल.

दाभा गावालगत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या २१.७ हेक्टर जागेवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. विमानतळ, रेल्वे स्थानक आणि शहराच्या मध्यवर्ती भागाशी उत्कृष्ट संपर्क असल्याने या केंद्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. झिरो माईलपासून हे केंद्र अवघ्या ७.८ किलोमीटर अंतरावर असून चारही दिशांनी सहज कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.

या केंद्रात आकर्षक लँडस्केप, कारंजे, अत्याधुनिक कॉन्फरन्स व सेमिनार हॉल, बोर्डरूम, डायनिंग हॉल तसेच दुचाकी, चारचाकी आणि बससाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा असणार आहे.

या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण म्हणजे २ हजार आसनक्षमतेचे अत्याधुनिक ऑडिटोरियम, जे आकारमानाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठ्या सभागृहांपैकी एक असणार आहे. तसेच संपूर्ण प्रकल्पात अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यात येत आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) मार्फत करण्यात येत असून, अधीक्षक अभियंता नरेश बोरकर यांनी सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची माहिती दिली. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित तसेच खासदार मायाताई इवनाते यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0