शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत आणि अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज मनुष्यबळ घडवावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथील रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बदलत्या तंत्रज्ञान आणि रोजगार क्षेत्राच्या गरजेनुसार शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत, रोजगारक्षम व अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज मनुष्यबळ घडवावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Aug 3, 2026 - 17:52
 0  10
शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत आणि अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज मनुष्यबळ घडवावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी, रामदेवबाबा विद्यापीठ

प्रतिनि

धीदेवानंद शिंदे 

नागपूर, दि. २ : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक संस्थांनी रोजगार क्षेत्रातील नव्या गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज आणि कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या रोजगार क्षेत्राला केवळ पदवीधरांची नव्हे, तर अर्थपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण योगदान देणाऱ्या सक्षम मनुष्यबळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर येथील रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’च्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी श्रीरामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल, उपाध्यक्ष एस. राठी, पी. पालडीवाल, महासचिव राजेंद्र पुरोहित, सचिव अॅड. प्रदीप अग्रवाल, कैलाशचंद्र अग्रवाल, कोषाध्यक्ष अशोककुमार पचेरीवाला, विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. एस. मंथा आणि कुलगुरू डॉ. आर. एस. पांडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था म्हणून रामदेवबाबा विद्यापीठाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षणाच्या मूळ उद्देशांशी जोडलेले राहून व्यापारीकरणापासून दूर राहण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेने केले आहे. खाजगी संस्था असूनही देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होतो. आज या संस्थेचे विद्यापीठात रूपांतर झाले असून, संशोधनाच्या क्षेत्रात तसेच शिक्षणाला नवा आकार देणाऱ्या देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये रामदेवबाबा विद्यापीठाचा समावेश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकॉन आणि क्वांटम कम्प्युटिंग ही तंत्रज्ञाने या शतकाच्या भविष्याला आकार देणारे प्रमुख घटक ठरणार आहेत. औद्योगिक क्रांतीचा विचार केला तर पहिल्या औद्योगिक क्रांतीला सुमारे १७४० मध्ये, दुसऱ्या औद्योगिक क्रांतीला १८६० मध्ये आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीला १९५० च्या सुमारास सुरुवात झाली. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांमुळे आज २०२६ मध्ये जग पाचव्या औद्योगिक क्रांतीची चर्चा करीत असून, ही क्रांती कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप टेक्नॉलॉजी आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जगाने आता सहाव्या औद्योगिक क्रांतीची चर्चादेखील सुरू केली आहे. तंत्रज्ञान आणि व्यवसायाचे स्वरूप ज्या वेगाने बदलत आहे, ते लक्षात घेता शैक्षणिक संस्थांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. बराच काळ जगात सीपीयूची चर्चा होत होती; आता जीपीयूची चर्चा होत आहे. क्वांटम कम्प्युटिंगमुळे संशोधन प्रक्रियेला अभूतपूर्व गती मिळत असून, बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोठे परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येत्या एक हजार दिवसांत रोजगार क्षेत्रातील सुमारे ७० टक्के नोकऱ्यांचे स्वरूप आमूलाग्र बदलणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नोकऱ्या कमी होणार नाहीत; मात्र त्यांचे स्वरूप निश्चितपणे बदलणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणारा हा बदल अटळ असून, जग ज्या वेगाने बदलत आहे, त्या वेगाशी सुसंगत राहण्यासाठी शैक्षणिक संस्थांनाही शिक्षणाच्या पद्धतीत आवश्यक बदल करावे लागतील, असे ते म्हणाले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातही व्यापक बदल घडत असून, रोगांच्या व्यवस्थापनाच्या पद्धतीत आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेले कृषी क्षेत्र हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक लाभ होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने अलीकडेच ‘महाविस्तार’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप सुरू केले असून, ते पूर्णपणे कृषी क्षेत्रासाठी समर्पित आहे. या ॲपच्या माध्यमातून कोणताही शेतकरी आपल्या भाषेत प्रश्न विचारून पिकांवरील कीड, खतांचे व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन किंवा शेतीशी संबंधित इतर समस्यांबाबत माहिती मिळवू शकतो.

पिकाचा फोटो अपलोड केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली त्या पिकाची सद्यस्थिती, भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या समस्या आणि आवश्यक व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती देऊ शकते. या तंत्रज्ञानामुळे शेतीचा उत्पादन खर्च सुमारे २५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो, तर उत्पादकता २५ ते ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. हीच कृत्रिम बुद्धिमत्तेची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

आज कोणतेही क्षेत्र एका चौकटीत राहिलेले नाही. अभियांत्रिकी, बायोटेक्नॉलॉजी किंवा इतर कोणतीही शाखा असो, आता केवळ स्वतंत्रपणे शिक्षण घेऊन चालणार नाही. बदलत्या काळात बहुविषयक दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज बनली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जगाच्या इतिहासाचा विचार केल्यास मोठ्या नवकल्पना केवळ उद्योगक्षेत्रातून नव्हे, तर विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधून उदयास आल्या आहेत. आज तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्यांची वाटचालही एखाद्या विद्यापीठातून किंवा संशोधन संस्थेतूनच सुरू झाली आहे. त्यामुळे ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि नावीन्य यांचे केंद्र म्हणून विद्यापीठांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

रामदेवबाबा विद्यापीठही संशोधन, ज्ञाननिर्मिती आणि नवोन्मेषाच्या परंपरेला अधिक बळकट करून देशातील संशोधन क्षेत्राला नवी दिशा देईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’चे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

यावेळी श्रीरामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांनी आपल्या मनोगतात हे केंद्र संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. एस. पांडे यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक, संशोधन आणि नवोन्मेष उपक्रमांचा आढावा घेतला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.