दिव्यांगांना रोजगार, आरोग्य आणि शिक्षणात प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्यांगांना जयपूर फूट साहित्य व सहाय्यक साधनांचे निःशुल्क वाटप करण्यात आले. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दिव्यांगांना रोजगार, आरोग्य आणि शिक्षणात प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दिव्यांग सक्षमीकरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयपूर फूट, दिव्यांगांना सहाय्यक साधने, नागपूर, दिव्यांग रोजगार, दिव्यांग आरोग्य,

प्रतिनिधी  : नरेश शिंदे 

नागपूर, दि. १० : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर, जिल्हा परिषद नागपूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग व कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींसाठी निःशुल्क जयपूर फूट साहित्य व सहाय्यक साधनांचे मोजमाप आणि वाटप शिबिर कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार संजय भेंडे, आमदार राजीव पोतदार, आमदार कृपाल तुमाने, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार मोहन मते, मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, मुख्यमंत्री कार्यालयाच्या सहसचिव आशा पठाण आदी उपस्थित होते.

सहाय्यक साधनांमुळे दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी संधी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींच्या गरजेनुसार जयपूर फूट साहित्य तसेच विविध सहाय्यभूत साधनांचे मोजमाप करून त्यांचे निःशुल्क वितरण करण्यात आले. आवश्यक साधने उपलब्ध झाल्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन त्यांना अधिक स्वावलंबी होण्यास मदत होईल.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यातही अशा प्रकारची शिबिरे सातत्याने आयोजित केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘जयपूर फूट’च्या माध्यमातून जीवनात परिवर्तन

मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालयातून दिव्यांगांसाठी अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानंतर नागपूर महानगरपालिका स्तरावर आवश्यक तयारी करण्यात आली. भगवान महावीर विकलांग सहायता समितीने या उपक्रमासाठी विशेष योगदान दिले असून, ही संस्था १९७५ पासून दिव्यांगांसाठी कार्यरत आहे.

‘जयपूर फूट’च्या माध्यमातून दिव्यांगांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे काम या संस्थेकडून केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विविध योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. राज्य शासनाकडूनही दिव्यांगांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांगांसाठी मानधन २,५०० रुपये करण्यात आले असून विविध योजनांच्या माध्यमातूनही त्यांना मदत केली जात आहे.

घरकुलासह अन्य शासकीय योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य कसे देता येईल, याबाबत शासन सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दिव्यांगतेकडे सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक

‘विकलांग’ऐवजी ‘दिव्यांग’ हा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून त्यांच्या क्षमतांना योग्य संधी देणे आवश्यक आहे. दिव्यांगता कमी करण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दिव्यांग व्यक्तींच्या यूडीआयडी (UDID) कार्डासाठी झोननिहाय कामकाज करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शासन भविष्यातही सातत्याने काम करीत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मान्यवरांचा सन्मान

महापौर नीता ठाकरे यांनी प्रास्ताविक करताना शिबिराच्या आयोजनाची आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादाची माहिती दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे पी. आर. मेहता यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘तिरंगा वंदे मातरम्’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रशांत उगेमुगे आणि डॉ. विजय कुमार शर्मा यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांनी मानले.