भारत टेक्स २०२६च्या धर्तीवर महाराष्ट्र सदनात आजपासून विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शन; दिल्लीकरांना पारंपरिक वस्त्रांची अनोखी पर्वणी

नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत महाटेक्स आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. पैठणी, हिमरू, करवत काठी साड्या, सोलापुरी चादरी, कोल्हापुरी चपला यांसह महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रोद्योगाचा अनुभव दिल्लीकरांना घेता येणार आहे.

Jul 18, 2026 - 04:06
 0  6
भारत टेक्स २०२६च्या धर्तीवर महाराष्ट्र सदनात आजपासून विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शन; दिल्लीकरांना पारंपरिक वस्त्रांची अनोखी पर्वणी
भारत टेक्स २०२६, महाराष्ट्र सदन, महाटेक्स, वस्त्रोद्योग प्रदर्शन, हातमाग, पैठणी, हिमरू, करवत काठी साडी, खण साडी, सोलापूर चादर, कोल्हापुरी चप्पल, दिल्ली, महाराष्ट्र

नवी दिल्ली | प्रतिनिधी : नरेश शिंदे 

देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन **‘भारत टेक्स २०२६’**च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित (महाटेक्स) आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रसंपदेची अनोखी पर्वणी अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेले हे तीन दिवसीय प्रदर्शन कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

सध्या प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या भारत टेक्स २०२६ प्रदर्शनात महाराष्ट्र सहभागी राज्य म्हणून आपली समृद्ध वस्त्रोद्योग परंपरा सादर करत आहे. राज्याच्या दालनाला देश-विदेशातील खरेदीदार, निर्यातदार आणि व्यावसायिक प्रतिनिधींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विणकरांनी तयार केलेली पारंपरिक व दर्जेदार उत्पादने थेट दिल्लीतील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र सदनात हे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या विविध पारंपरिक वस्त्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आकर्षक पैठणी साड्या, करवत काठी साड्या, हिमरू वस्त्रे, खण साड्या, सोलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू व टेरी टॉवेल्स तसेच जीआय टॅग प्राप्त कोल्हापुरी चपला यांसारख्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे.

राज्यातील विणकरांकडून थेट ग्राहकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कलेला आणि पारंपरिक उद्योगाला राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना महाराष्ट्राच्या समृद्ध हस्तकला, हातमाग आणि वस्त्रोद्योग परंपरेचा जवळून अनुभव घेण्याची तसेच थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0