दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्येत अभंगांचा सुरेल जल्लोष; ‘पंढरपूर वारी’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्येत विठ्ठल भक्तीचा अनोखा अनुभव दिल्लीकरांना मिळाला. गायिका शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनासह ‘पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले.

Jul 24, 2026 - 03:13
 0  6
दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्येत अभंगांचा सुरेल जल्लोष; ‘पंढरपूर वारी’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन
माझे माहेर पंढरी, पंढरपूर वारी माहितीपट, Pandharpur Wari Documentary,

नवी दिल्ली | प्रतिनिधी नरेश शिंदे 

देशाच्या राजधानीत गुरुवारी संध्याकाळी विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिरसाचा अविस्मरणीय सोहळा रंगला. महाराष्ट्र सदन, सरहद (पुणे) आणि महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझे माहेर पंढरी’ या विशेष भक्तीसंध्येला दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ‘पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा’ या विशेष माहितीपटाचेही प्रदर्शन करण्यात आले.

उदय सामंत यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण

महाराष्ट्र सदनातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतिभा पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मेधा कुलकर्णी, बजरंग सोनवणे, भाऊसाहेब वाकचौरे, रामराव वडकुते, श्रीरंग बारणे, राजेंद्र जैन आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासह केंद्र सरकारच्या विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी, मान्यवर आणि दिल्लीतील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शमिमा अख्तर यांच्या अभंगांनी जिंकली रसिकांची मने

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या प्रसिद्ध गायिका शमिमा अख्तर. काश्मीरच्या शमिमा अख्तर यांनी आपल्या भावपूर्ण आणि सुरेल आवाजात ‘माझे माहेर पंढरी’, ‘आजि सोनियाचा दिनू’ आणि ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ यांसह अनेक अभंग सादर केले.

त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा भक्तिमय अनुभव दिल्लीकरांनी मनापासून अनुभवला.

‘पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन

कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या सहकार्याने निर्मित ‘Pandharpur Wari : In The Footsteps of Saints’ (पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा) या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले.

महाराष्ट्राची संतपरंपरा, पंढरपूर वारीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा माहितीपट मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा नऊ भाषांमध्ये तयार करण्यात आला असून, तो डिस्कव्हरी नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर प्रसारित होत आहे.

महाराष्ट्राची संस्कृती राजधानीत झळकली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'सरहद'चे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सरहदचे समन्वयक लेशपाल जवळगे आणि शैलेश पगारिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी तसेच दिल्लीतील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भक्ती, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अनोखा संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमामुळे महाराष्ट्र सदन परिसरात जणू पंढरपूरचीच अनुभूती निर्माण झाली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0