मखमलाबाद रस्त्यावरील कथित निष्काळजीपणाप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस (ओबीसी सेल)चे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांचे निवेदन
नाशिकच्या मखमलाबाद रस्त्यावरील सुरू असलेल्या कामातील कथित निष्काळजीपणाबाबत संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी सेल)चे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी केली आहे.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. २५ : नाशिक शहरातील मखमलाबाद रस्त्यावरील सुरू असलेल्या कामात कथित निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी सेल)चे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश रा. आव्हाड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी म्हसरूळ (पंचवटी) येथील सहाय्यक पोलीस आयुक्त, युनिट-१ यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहरातील विविध भागांमध्ये रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः मखमलाबाद रस्ता अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत असून, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक, धोक्याचे इशारे, रिफ्लेक्टर आणि इतर सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात दि. २३ जुलै रोजी रात्री मखमलाबाद रस्त्यावर एका चारचाकी वाहनाचा खोदलेल्या खड्ड्यात अपघात झाल्याचा उल्लेख करण्यात आला असून, अशा घटनांमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने या प्रकरणामागे अर्थकारण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.
रस्त्यांच्या कामांदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी, यंत्रणा आणि कंत्राटदारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ॲड. आव्हाड यांनी केली आहे.
मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी तुकाराम बनकर, तुकाराम हांडोरे, मानसिंग ढोमसे, कैलास सोनवणे, बन्सीलाला भागवत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी सेल)चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0