'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा अनोखा संदेश; मुलीला उंटावर बसवून शाळेत पोहोचवले

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सामाजिक कार्यकर्ते रवी जोशी यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा अनोखा संदेश देत शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या मुलीला उंटावर बसवून शाळेत पोहोचवले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नागरिक आणि शिक्षकांनी कौतुक केले.

Jun 30, 2026 - 15:27
 0  7
'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा अनोखा संदेश; मुलीला उंटावर बसवून शाळेत पोहोचवले
बेटी बचाओ बेटी पढाओ, खामगाव, बुलढाणा, रवी जोशी, मुलीचे शिक्षण,

बुलढाणा | ब्यूरो : अमोल सराफ : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' आणि 'मेरी बेटी, मेरा अभिमान' या अभियानाचा प्रभावी संदेश देण्यासाठी खामगाव येथील एका वडिलांनी अनोखा उपक्रम राबवला. शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या मुलीचे औक्षण करून तिला उंटावर बसवत मोठ्या उत्साहात शाळेत पोहोचवले.

खामगाव शहरातील सराफा परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते रवी जोशी यांची कन्या शिप्रा रवी जोशी हिने पाचवी इयत्ता यशस्वीरीत्या पूर्ण करून यावर्षी सहावीत प्रवेश घेतला आहे. ३० जूनपासून विदर्भातील शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानिमित्त रवी जोशी यांनी आपल्या मुलीचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय करण्याचा निर्णय घेतला.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी शिप्राला उंटावर बसवून शाळेत नेले. या अनोख्या उपक्रमामागील उद्देश मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि समाजात मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सकारात्मक संदेश पोहोचवणे हा होता.

शाळेच्या परिसरात पोहोचताच विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनीही हा अनोखा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपत रवी जोशी यांच्या सामाजिक संदेशाला दाद दिली.

मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाचा संदेश अशा कृतीतून अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचू शकतो, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0