भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; १.९० कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त
भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून गोव्यातील विक्रीसाठी असलेला अवैध विदेशी मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत १ कोटी ९० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई प्रतिनिधी नरेश शिंदे, दि. १७ : परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत भिवंडी येथे तब्बल १ कोटी ९० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा, कंटेनर ट्रक आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले होते. त्यानुसार ठाणे-२ विभागाच्या भिवंडी पथकाने मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे गावाजवळ सापळा रचून संशयित अशोक लेलँड कंपनीचा ६ चाकी कंटेनर (क्रमांक HR-61 F-1508) अडवला.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोव्यातील विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याच्या तब्बल ७७ हजार ७६० सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या मद्याचा साठा १ हजार ६२० बॉक्समध्ये भरलेला होता. याप्रकरणी हनुमान मोबता राम (वय २८, रा. पिरु का तला, सेदवा, बाडमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विदेशी मद्याच्या ७७ हजार ७६० बाटल्यांची किंमत १ कोटी ६३ लाख २९ हजार ६०० रुपये, अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनरची किंमत २७ लाख रुपये आणि एका मोबाईलची किंमत ६ हजार रुपये असा एकूण १ कोटी ९० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे-२ चे अधीक्षक उत्तम शिंदे आणि उपअधीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत निरीक्षक सुभाष खंडेराय, दीपक परब, दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, आप्पा चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अर्जुन कापडे तसेच जवान नारायण जानकर, गणेश पाटील, सचिन पवार, निलेश तायडे आणि स्वरूपा भोसले यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सुभाष खंडेराय करीत आहेत.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अवैध मद्यनिर्मिती किंवा बेकायदेशीर मद्य वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा लँडलाईन क्रमांक ०२२-२०८२२४८८ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
