२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून हा दिवस राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव मंजूर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई प्रतिनिधी नरेश शिंदे, दि. १७ : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. या दिवशी गावातील किंवा शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांचा गौरव करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव वी. आर. ठाकूर, अवर सचिव सुनील सरदार, प्रसाद कुलकर्णी, सहआयुक्त वर्षा पवार, उपायुक्त संगीता लोंढे, विजय क्षीरसागर, जामसिंग गिरासे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यात ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही अधिक सन्मानजनक संज्ञा वापरण्यात यावी. तसेच, गाव किंवा शहरांमध्ये एकल महिलांना रूढी-परंपरांच्या आधारावर अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही, यासाठी ग्रामसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ठराव मंजूर करण्यात यावेत.
यावेळी राज्य शासनाच्या प्रस्तावित एकल महिला धोरणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा याविषयी महिलांची मते, सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन त्या शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात यावी. रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींबाबत चर्चा करून बचत गटांमध्ये नसलेल्या महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
या उपक्रमामुळे शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ अधिक प्रभावीपणे एकल महिलांपर्यंत पोहोचेल. तसेच समाजात एकल महिलांना सन्मानपूर्वक आणि समानतेची वागणूक मिळण्यासाठी जनजागृती होऊन त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
