म्हाडा आणि महाटेनिस फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार; मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे टेनिस प्रशिक्षण केंद्र
म्हाडा आणि महाटेनिस फाऊंडेशन यांच्यात मुंबईत जागतिक दर्जाच्या टेनिस पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. अंधेरीतील सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक टेनिस कोर्ट, प्रशिक्षण केंद्र आणि क्रीडा सुविधा विकसित केल्या जाणार असून राज्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. १६ जून : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि महाटेनिस फाऊंडेशन यांच्यात मुंबई शहर व उपनगरातील टेनिस खेळाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारामुळे मुंबईत जागतिक दर्जाच्या टेनिस पायाभूत सुविधांच्या निर्मितीला चालना मिळणार असून राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या करारावर स्वाक्षरी करताना म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या मंजुरीनुसार अंधेरी येथील मौजे कोलेकल्याण परिसरातील सुमारे ८,००० चौरस मीटर (सुमारे २ एकर) क्षेत्रफळाचा म्हाडाच्या मालकीचा भूखंड ३० वर्षांसाठी संयुक्त भागीदारी तत्त्वावर महाटेनिस फाऊंडेशनला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक टेनिस कोर्ट, प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक सुविधा आणि खेळाडूंसाठी पूरक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी म्हाडाकडून १० कोटी रुपये तर महाटेनिस फाऊंडेशनकडून ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील युवा टेनिसपटूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा मिळून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.
सामंजस्य करारानुसार भूखंडाची मालकी, हक्क आणि ताबा पूर्णपणे म्हाडाकडेच राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत भूखंडाचे मालकी हक्क, भाडेपट्टा किंवा तृतीय पक्षाचे हक्क निर्माण करता येणार नाहीत. तसेच प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारती आणि पायाभूत सुविधा म्हाडाच्या मालकीच्या राहतील.
या केंद्राचा वापर केवळ टेनिस प्रशिक्षण, सराव, स्पर्धा आणि क्रीडा प्रोत्साहनासाठीच केला जाणार आहे. म्हाडाच्या पूर्वपरवानगीशिवाय वापरामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. सर्व वैधानिक परवानग्या, देखभाल, अग्निसुरक्षा, विमा, कर आणि इतर खर्चाची जबाबदारी महाटेनिस फाऊंडेशनवर राहणार आहे.
करारातील महत्त्वाच्या तरतुदीनुसार, क्रीडा उपक्रमांव्यतिरिक्त होणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक उत्पन्नापैकी ४० टक्के हिस्सा म्हाडाकडे जमा करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र प्रकल्प खाते आणि नियमित लेखापरीक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
याशिवाय म्हाडा व राज्य शासनातील अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांसाठी विशेष टेनिस प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून दरवर्षी २० विद्यार्थ्यांना मोफत व्यावसायिक टेनिस प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रकल्पाच्या व्यवस्थापन समितीवर गृहनिर्माण विभाग आणि म्हाडाचे प्रतिनिधी असणार असून कामकाजावर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे.
मुंबई आणि उपनगरातील युवक-युवतींना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देतानाच महाराष्ट्रातून अधिकाधिक गुणवंत टेनिसपटू घडविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गृहनिर्माणाबरोबरच क्रीडा, सामाजिक आणि सार्वजनिक सुविधा विकसित करून नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या म्हाडाच्या वचनबद्धतेचे हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0