निसर्गरम्य रुईपेठा शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आनंदोत्सवात; नवागतांचे जल्लोषात स्वागत

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील रुईपेठा येथील जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव आणि आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सजविलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश, पुस्तके आणि खाऊचे वाटप करण्यात आले. आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण, समृद्ध ग्रंथालय आणि सौरऊर्जेच्या वापरामुळे ही शाळा ग्रामीण भागातील आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण करत आहे.

Jun 15, 2026 - 21:49
 0  1
निसर्गरम्य रुईपेठा शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आनंदोत्सवात; नवागतांचे जल्लोषात स्वागत
निसर्गरम्य रुईपेठा शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आनंदोत्सवात;

नाशिक ब्युरो: जिल्ह्यातील पेठ तालुक्याला निसर्गाने भरभरून सौंदर्य बहाल केले आहे. लहान-मोठ्या टेकड्या, हिरवीगार वृक्षराजी आणि पावसाळ्यात पाण्याने भरलेली भातखाचरे यांमुळे हा परिसर अधिकच नयनरम्य बनतो. अशाच निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या रुईपेठा येथील जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आनंदोत्सवात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत रुईपेठा शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सजविलेल्या कारमधून विद्यार्थ्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी प्रत्येक शाळेसाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची रुईपेठा शाळेसाठी समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

रुईपेठा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून यावर्षी पहिलीत आठ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी सहा विद्यार्थी प्रवेशोत्सवाच्या दिवशी उपस्थित होते. त्यांचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सरपंच विनायक भोये, उपसरपंच पंडितराव भोये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण भिवसन, मुख्याध्यापक हनुमंत खंबाईत आणि शिक्षक आनंदा काकड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश, पाठ्यपुस्तके तसेच खाऊचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शाळेतील ग्रंथालयाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच याच परिसरातून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत घडल्याचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी मेहनत करण्याचा सल्ला दिला.

रुईपेठा जिल्हा परिषद शाळा आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. शाळेच्या परिसरात विविध प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध आहे. शाळेच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असून सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे परिसरावर देखरेख ठेवली जाते.

डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक असलेले संगणक, प्रिंटर आणि अन्य साहित्य शाळेत उपलब्ध आहे. तसेच शाळेच्या ग्रंथालयात ग्रामपंचायत आणि विविध संस्थांच्या सहकार्याने आठशेहून अधिक पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी प्रत्येक शनिवारी ‘नो दप्तर डे’ उपक्रम राबविण्यात येतो. या दिवशी विद्यार्थी ग्रंथालयातील विविध पुस्तके वाचून ज्ञानार्जन करतात, अशी माहिती मुख्याध्यापक हनुमंत खंबाईत यांनी दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने रुईपेठा जिल्हा परिषद शाळा एक आदर्श ठरत असून प्रवेशोत्सवामुळे नवागत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात झाली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0