राज्यभर एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्यांच्या बैठका सुरू; लोकसहभागातून आरोग्य सेवांना नवी गती
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांच्या सहभागातून आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविणे, स्थानिक समस्या सोडविणे आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख बनविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मुंबई, दि. १३ जून : राज्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, प्रभावी आणि समन्वयपूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्यांच्या बैठका राज्यभर सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होत असून स्थानिक स्तरावरील आरोग्यविषयक समस्यांच्या निराकरणाला गती मिळत आहे.
१३ जून २०२६ पर्यंत राज्यातील २५ जिल्ह्यांमधील विधानसभा स्तरावरील समित्यांपैकी चार समित्यांच्या बैठका यशस्वीरीत्या पार पडल्या असून २१ समित्यांच्या बैठका नियोजित आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर तसेच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे बैठका पार पडल्या आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे १३ जून रोजी समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
याशिवाय रायगडमधील पेन, पालघरमधील विक्रमगड, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव (आऊटर), बागलाण, कळवण, दिंडोरी, कोल्हापूरमधील राधानगरी, कागल, शाहुवाडी, इचलकरंजी, रत्नागिरीतील दापोली, हिंगोलीतील बसमत, अकोट, बाळापूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या मतदारसंघांमध्ये बैठकींच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू असल्याने तेथील बैठका पुढील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
नियमित आढावा आणि प्रभावी समन्वय
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालकमंत्री तसेच विधानसभा सदस्यांना समिती स्थापनेसंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून बैठकींच्या आयोजनासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राज्यस्तरावर गुगल शीट, दूरध्वनी संपर्क आणि जिल्हास्तरीय समन्वय यंत्रणेद्वारे समित्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जात आहे.
आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचे व्यासपीठ
एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्यांच्या माध्यमातून आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता सुधारणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करणे, स्थानिक आरोग्य समस्यांचे त्वरित निराकरण करणे, समुदाय सहभाग वाढविणे आणि आरोग्य संस्थांचा गुणात्मक दर्जा उंचावणे यावर भर दिला जात आहे.
तसेच नागरिकांना अधिक सुलभ, दर्जेदार आणि उत्तरदायी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे समित्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
चार स्तरांवर समित्यांची रचना
राज्यातील आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी समित्यांची चार स्तरांवर रचना करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, महानगरपालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघ, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्यांचा समावेश आहे.
या समित्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य अधिकारी आणि नागरिक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद घडून येणार असून आरोग्य सेवांमध्ये उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि परिणामकारकता वाढण्यास मदत होणार आहे.
लोकसहभागातून ‘निरोगी महाराष्ट्र’चे उद्दिष्ट
आरोग्य सेवा केवळ उपचारांपुरती मर्यादित न ठेवता लोकसहभाग, स्थानिक नेतृत्व आणि प्रभावी समन्वयाच्या माध्यमातून अधिक सक्षम बनविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्या या प्रयत्नांना संस्थात्मक स्वरूप देत असून "निरोगी महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र" या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
स्थानिक आरोग्यविषयक गरजा, अडचणी आणि नागरिकांच्या अपेक्षांचा थेट आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरत असून राज्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी बनविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0