ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी तांत्रिक इमारतीच्या जागेची उच्चाधिकारी समितीकडून पाहणी; तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबईच्या पूर्व आणि दक्षिण भागाला जोडणाऱ्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक इमारतीच्या बांधकामाकरिता उच्चाधिकारी समितीने स्वराज्यभूमी परिसराची पाहणी केली. मफतलाल जलतरण तलावातील बास्केटबॉल मैदानाच्या जागेची पडताळणी करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले.

Jun 10, 2026 - 18:37
 0  6
ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी तांत्रिक इमारतीच्या जागेची उच्चाधिकारी समितीकडून पाहणी; तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
ऑरेंज गेट मरीन ड्राइव्ह बोगदा, मुंबई दुहेरी बोगदा प्रकल्प

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईच्या पूर्व आणि दक्षिण भागाला थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला गती मिळत असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक इमारतीच्या बांधकामासाठी उच्चाधिकारी समितीने (High Power Committee) आज स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) परिसराची पाहणी केली.

या प्रकल्पासाठी छोटी चौपाटी परिसरात तांत्रिक इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र गिरगाव चौपाटी परिसरातील संवेदनशीलता लक्षात घेता पर्यायी जागेचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि उच्चाधिकारी समितीच्या सदस्यांनी संयुक्त स्थळ पाहणी केली.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी मफतलाल जलतरण तलाव परिसरातील बास्केटबॉल मैदानाच्या ठिकाणी तांत्रिक इमारत उभारता येईल का, याची सविस्तर पडताळणी करून त्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले.

स्थळ पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी (मुंबई शहर) श्रीमती आंचल गोयल, उच्चाधिकारी समितीच्या सदस्या श्रीमती इंद्रायणी मलकानी, सहायक आयुक्त (डी विभाग) संतोष साळुंके, मत्स्य विभागाचे अधिकारी तसेच एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

५ मिनिटांत ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास

एमएमआरडीएच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे), अटल सेतू, मरीन ड्राइव्ह आणि मुंबई किनारी रस्ता यांना जोडणारा सुमारे ९.२ ते १० किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा उभारण्यात येत आहे. यातील सुमारे ७ किलोमीटर मार्ग भूमिगत असेल.

या प्रकल्पात दोन स्वतंत्र बोगद्यांमध्ये बहुपदरी वाहतूक व्यवस्था, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध असतील. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवासाचा कालावधी सध्याच्या २२ ते ४० मिनिटांवरून केवळ ५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

या बोगदा प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून पूर्व आणि दक्षिण मुंबईमधील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. तसेच प्रवाशांचा वेळ, इंधन आणि वाहतूक खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पर्यायी जागेचा शोध

गिरगाव चौपाटी परिसरात कोणतेही बांधकाम करण्यासाठी उच्चाधिकारी समितीची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याने यापूर्वी ८ जून २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात समितीची बैठक झाली होती. या बैठकीत गिरगाव चौपाटीऐवजी इतर पर्यायी जागेचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आजची संयुक्त पाहणी पार पडली.

उच्चाधिकारी समितीच्या शिफारशीनुसार मफतलाल जलतरण तलावातील बास्केटबॉल मैदानाच्या जागेवर तांत्रिक इमारत उभारण्याबाबत एमएमआरडीएकडून सविस्तर तांत्रिक पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेला आणि पुढील मंजुरीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0