संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024-25 जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव
संगीत नाटक अकादमीने 2024 आणि 2025 सालांसाठीचे प्रतिष्ठित अकादमी पुरस्कार, फेलोशिप आणि उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायक आनंद भाटे, अरुण कशाळकर, संगीतकार अशोक पत्की, अभिनेते अरुण नलावडे यांच्यासह अनेक दिग्गज व युवा कलावंतांना राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.
नवी दिल्ली, 11 जून : भारतीय संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककलांच्या संवर्धनासाठी देशातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमीने वर्ष 2024 आणि 2025 साठीचे प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार, अकादमी फेलोशिप आणि उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ, दिग्गज तसेच युवा कलावंतांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
या पुरस्कारांमुळे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला राष्ट्रीय पातळीवर विशेष मान्यता मिळाली असून संगीत, नाट्य, नृत्य, लोककला आणि पारंपरिक कलाक्षेत्रातील कलाकारांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला आहे.
वर्ष 2024 मधील महाराष्ट्राचे पुरस्कार मानकरी
वर्ष 2024 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय गायन क्षेत्रातील ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर आणि अभंग गायनासाठी प्रसिद्ध असलेले आनंद भाटे यांचा समावेश आहे.
अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अरुण नलावडे, पारंपरिक रंगभूमी क्षेत्रासाठी मुकुंद मराठे, लोकनृत्य क्षेत्रासाठी सुभाष नारायण नकाशे तसेच नृत्य क्षेत्रातील संशोधन आणि अभ्यासपूर्ण कार्यासाठी शुभदा वरदकर यांची निवड करण्यात आली आहे.
उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार 2024 अंतर्गत हिंदुस्तानी गायनासाठी कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, भारूड या लोकसंगीत प्रकारासाठी भावार्थ रामचंद्र देखणे, बाहुलीनाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण गणपत मसगे आणि लोकनृत्य व लोकसंगीतासाठी चेतन वामन खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
वर्ष 2025 मधील महाराष्ट्राचे पुरस्कार मानकरी
वर्ष 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये शहनाई वादनासाठी शैलेश भागवत, दिग्दर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रमोद डी. पवार, नाट्यसंगीत क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानासाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की तसेच कथक नृत्य क्षेत्रातील विशेष कार्यासाठी मनीषा साठे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तसेच उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार 2025 अंतर्गत हार्मोनियम वादनातील प्रावीण्यासाठी तन्मय देवचके आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील ‘जागर’ या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण प्रताप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कारांचे स्वरूप
संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये रोख रक्कम, ताम्रपट आणि शाल असे आहे. तर युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारामध्ये 25 हजार रुपये, ताम्रपट आणि शाल प्रदान करण्यात येते.
हे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अकादमीतर्फे देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कलावंतांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे राज्याच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडली आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0