महाराष्ट्र सदनातील भव्य गणेशोत्सवाचे राज्यपालांना निमंत्रण; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचा राजधानी दिल्लीत जागर
दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना उत्सवाचे निमंत्रण दिले.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
नवी दिल्ली, दि. ४ : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमंत्रण महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना देण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना गणेशोत्सवाचे निमंत्रण दिले. यावेळी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही देण्यात आली.
१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान भव्य गणेशोत्सव
सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्र सदनात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भव्य गणेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डॉ. श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाची तयारी करण्यात येत असून, या माध्यमातून राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे दिमाखदार दर्शन घडणार आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीतील नागरिकांना महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेता यावा, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ सप्टेंबरला मिरवणुकीनंतर प्राणप्रतिष्ठापना
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल.
सायंकाळी जुन्या महाराष्ट्र सदनात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची महाआरती होणार आहे.
मराठी नाटकापासून गझल आणि लोककलेपर्यंत मेजवानी
गणेशोत्सवात मराठी नाट्य, चित्रपटगीते, गझल, लोककला, लावणी, नृत्य यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिल्लीकरांना अनुभवता येणार आहे.
१५ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे भरत जाधव व अन्य कलाकारांचा गाजलेला मराठी नाट्यप्रयोग ‘सही रे सही’ सादर करण्यात येणार आहे.
१७ सप्टेंबर रोजी वैभव जोशी आणि संदीप खरे यांचा विशेष कार्यक्रम होणार असून, १८ सप्टेंबर रोजी संतोष भांगरे प्रस्तुत ‘महाराष्ट्राची लोककला’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
सत्यनारायण पूजा आणि मराठी गझल कार्यक्रम
१९ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सायंकाळी गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा मराठी गझल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
२० सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे, शरद दाते आणि अन्य गायकांचा ‘मराठी चित्रपट गीते’ हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
पाककला स्पर्धा, खेळ पैठणीचा आणि लावणीचेही आकर्षण
गणेशोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत विविध मनोरंजनात्मक उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये पाककला स्पर्धा, भरतनाट्यम, खेळ पैठणीचा, लावणी तसेच हिंदी-मराठी गायन आणि नृत्याचे कार्यक्रम प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
या विविध कार्यक्रमांमुळे दिल्लीतील महाराष्ट्रप्रेमी आणि गणेशभक्तांना महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेता येणार आहे.
२५ सप्टेंबरला भव्य विसर्जन मिरवणूक
गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर रोजी झांज पथकासह श्रींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. जुन्या महाराष्ट्र सदनातून निघणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी होणार आहेत.
भक्ती, उत्साह आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा संगम या विसर्जन मिरवणुकीत अनुभवता येणार आहे.
सर्व कार्यक्रम विनामूल्य; विशेष कार्यक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक
उत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आले आहेत. मात्र १५, १७, १८, २० आणि २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
दिल्लीतील नागरिक, महाराष्ट्रप्रेमी आणि गणेशभक्तांनी या भव्य गणेशोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि भक्ती, परंपरा व महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचा अनोखा संगम अनुभवावा, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0