बोरीवली स्थानकाच्या पुनर्बांधणीसह एसी लोकल सेवांच्या विस्तारासाठी आमदार संजय उपाध्याय यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीला गती देण्यासह एसी लोकल सेवांची संख्या वाढविणे, बोरीवली-बेलापूर आणि बोरीवली-कल्याण लोकल सेवा सुरू करणे तसेच उपनगरीय रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी आमदार संजय उपाध्याय यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

Jun 14, 2026 - 18:16
 0  3
बोरीवली स्थानकाच्या पुनर्बांधणीसह एसी लोकल सेवांच्या विस्तारासाठी आमदार संजय उपाध्याय यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
संजय उपाध्याय, बोरीवली रेल्वे स्थानक, अश्विनी वैष्णव, अमृत भारत

मनिषा गुरव :- चीफ एडिटर

नवी दिल्ली : मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांच्या अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाच्या आधुनिकीकरण व पुनर्बांधणीला मंजुरी मिळाल्याने या कामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार उपाध्याय यांनी सांगितले की, बोरीवली हे मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून येथे दररोज सुमारे ४.५ लाख प्रवासी प्रवास करतात. वाढत्या प्रवासीसंख्येच्या पार्श्वभूमीवर आधुनिक सुविधा आणि सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

एसी लोकल सेवांच्या विस्ताराची मागणी

रेल्वेमंत्र्यांना पाठविलेल्या स्वतंत्र पत्रांमध्ये आमदार उपाध्याय यांनी बोरीवली ते चर्चगेटदरम्यान एसी लोकल गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर वाढणाऱ्या गर्दीचा विचार करता अधिक एसी लोकल सेवा सुरू करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मेमू गाड्यांच्या जागी आधुनिक लोकल सेवा

दहाणू रोड, विरार आणि बोरीवलीदरम्यान धावणाऱ्या मेमू सेवांच्या जागी नवीन लोकल गाड्या सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सध्या धावणाऱ्या मेमू गाड्यांमध्ये अस्वच्छता, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि जुन्या रॅकची समस्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याऐवजी एसी आणि नॉन-एसी डब्यांचा समावेश असलेल्या आधुनिक लोकल गाड्या सुरू केल्यास उपनगरीय प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

बोरीवली-बेलापूर आणि अंधेरी-बेलापूर लोकलची मागणी

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ, शैक्षणिक संस्था आणि रोजगाराच्या संधींमुळे पश्चिम उपनगरांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिक दररोज नवी मुंबईकडे प्रवास करतात. या प्रवासात अनेकदा लोकल बदलावी लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते.

ही समस्या दूर करण्यासाठी अंधेरी ते बेलापूर (एसी/नॉन-एसी) लोकल सेवा सकाळी ६ वाजल्यापासून सुरू करावी तसेच बोरीवली ते बेलापूर थेट लोकल सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी आमदार उपाध्याय यांनी केली आहे.

बोरीवली-कल्याण लोकलचीही मागणी

पश्चिम उपनगरांतील नागरिकांना कल्याणला जाण्यासाठी सध्या दादर येथे जाऊन लोकल बदलावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी बोरीवली–वसई–दिवा मार्गे कल्याणपर्यंत थेट लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.

विलेपार्ले स्टेशनवरील एस्कलेटरसाठी आभार

यापूर्वी रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आमदार संजय उपाध्याय यांनी विलेपार्ले रेल्वे स्थानकावर स्वयंचलित जिने (एस्कलेटर) बसविण्याची मागणी केली होती. या मागणीची अंमलबजावणी सुरू झाल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त केले.

रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून लाखो दैनंदिन प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक रेल्वे सेवांचा लाभ मिळू शकेल, अशी अपेक्षा आमदार संजय उपाध्याय यांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0