पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात विशेष सत्कार; लोकसेवेच्या कार्याचा गौरव

पद्मश्री जनार्दन बोथे यांचा नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात विशेष सत्कार करण्यात आला. निवासी आयुक्त व सचिव आर. विमला यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बोथे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे योगदान अधोरेखित केले.

May 27, 2026 - 01:07
 0  6
पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात विशेष सत्कार; लोकसेवेच्या कार्याचा गौरव
पद्मश्री जनार्दन बोथे, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली

नवी दिल्ली, दि. २६ मे : समर्पित लोकसेवेद्वारे महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावणारे पद्मश्री जनार्दन बोथे यांचा आज नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात विशेष सत्कार सोहळा पार पडला.

महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन जनार्दन बोथे यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते तसेच महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना पद्मश्री जनार्दन बोथे म्हणाले की, देशाच्या राजधानीत आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र सदनात झालेला हा सन्मान त्यांच्यासाठी घरच्या कौतुकासारखा आहे.

ते म्हणाले, हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव आहे. अमरावती येथील गुरुकुंज आश्रमातून हजारो विद्यार्थी आणि कार्यकर्ते संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम जपण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.

गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळेच आज येथे पोहोचता आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी बोलताना निवासी आयुक्त आर. विमला यांनी जनार्दन बोथे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत महाराष्ट्राच्या मातीतून राष्ट्रीय स्तरावर कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

माहिती संचालक हेमराज बागुल यांनीही जनार्दन बोथे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

समाजसेवा, संस्कार आणि राष्ट्रकार्याचा संदेश देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित हा सोहळा महाराष्ट्र सदनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.