पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर पोलीस दलाच्या २६ नवीन वाहनांचे लोकार्पण

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना (डीपीडीसी) निधीतून खरेदी करण्यात आलेल्या २६ नवीन वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे २ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून ही वाहने पोलीस दलाला उपलब्ध करून देण्यात आली.

Jun 14, 2026 - 16:39
 0  2
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर पोलीस दलाच्या २६ नवीन वाहनांचे लोकार्पण
प्रकाश आबिटकर, कोल्हापूर पोलीस दल, डीपीडीसी निधी

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

कोल्हापूर, दि. १३ जून : कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना (डीपीडीसी) निधीतून खरेदी करण्यात आलेल्या २६ नवीन वाहनांचे लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहनांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढून कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास अधिक मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. अशोक माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमीन, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज विभाग) अण्णासाहेब जाधव, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, गृह उपअधीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून २ स्कॉर्पिओ एन, ७ स्कॉर्पिओ क्लासिक, ११ बोलेरो निओ प्लस, १ इनोव्हा क्रिस्टा, १ वज्र वाहन आणि ७ मोटारसायकली खरेदी करण्यात आल्या आहेत.

यापूर्वीही सन २०२४-२५ मध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्या निधीतून २६ चारचाकी वाहनांचे हस्तांतरण कोल्हापूर पोलीस दलाला करण्यात आले होते.

सध्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडे एकूण ४५५ वाहने कार्यरत असून त्यामध्ये २१३ दुचाकी आणि २४२ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या वाहनांमुळे दुर्गम भागातील पोलीस यंत्रणेची गतिमानता वाढण्यास मदत होणार आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधा आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. नवीन वाहनांमुळे पोलीस दलाची प्रतिसाद क्षमता वाढेल, गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल. भविष्यातही पोलीस विभागाच्या गरजेनुसार आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास पोलीस विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0