ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये; २ ऑक्टोबरपासून कोल्हापूर जिल्ह्यात १०० टक्के नोंदणीसाठी विशेष मोहीम

ईएसआयसीच्या आरोग्य व सामाजिक सुरक्षा सुविधांपासून पात्र कामगार वंचित राहू नयेत यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात २ ऑक्टोबरपासून १०० टक्के नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

Sep 18, 2026 - 02:12
 0  10
ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये; २ ऑक्टोबरपासून कोल्हापूर जिल्ह्यात १०० टक्के नोंदणीसाठी विशेष मोहीम
ईएसआयसी, ESIC, ईएसआयसी नोंदणी, कोल्हापूर ईएसआयसी, प्रकाश आबिटकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, कामगार विमा योजना, कामगार कल्याण, कामगार सामाजिक सुरक्षा, ESIC

प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. १७ सप्टेंबर २०२६ (जिमाका) : राज्य कामगार विमा योजनेचा अर्थात ईएसआयसीचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला पाहिजे. पात्र असूनही केवळ नोंदणीअभावी एकही कामगार ईएसआयसीच्या आरोग्य व सामाजिक सुरक्षा सुविधांपासून वंचित राहता कामा नये, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात १०० टक्के नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून २ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

या संदर्भात पालकमंत्री आबिटकर यांनी राज्य कामगार विमा योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील ईएसआयसी नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील पात्र कामगारांची संख्या, सध्या झालेली नोंदणी, नोंदणीपासून वंचित असलेले कामगार तसेच संबंधित आस्थापनांची माहिती घेण्यात आली. पात्र कामगारांपर्यंत ईएसआयसी योजनेच्या सुविधा पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय यंत्रणेचाही आढावा घेण्यात आला.

वेतनाच्या अटीतील बदलाची माहिती पोहोचविण्यावर भर

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, यापूर्वी ईएसआयसीच्या लाभासाठी असलेली २१ हजार रुपयांची वेतनाची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे वेतनाच्या रचनेतील बेसिक, डीए, आरए आदी घटकांचा विचार करून पात्र ठरणाऱ्या कामगारांनाही योजनेच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

या बदलाची माहिती कामगार, उद्योग, विविध आस्थापना आणि संबंधित संस्थांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. ईएसआयसीच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या आरोग्य व सामाजिक सुरक्षा सुविधांचा पात्र कामगारांना लाभ मिळावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

१ ऑक्टोबरला संबंधित विभागप्रमुखांची बैठक

विशेष नोंदणी मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पुरवठा अधिकारी, ग्रंथालय संचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण यांच्यासह अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीमध्ये प्रत्येक विभागाची भूमिका निश्चित करण्यात येणार असून, संबंधित विभागांच्या कार्यक्षेत्रातील पात्र कामगार, कर्मचारी, आस्थापना आणि इतर संबंधित घटकांची माहिती संकलित करण्याचे नियोजन केले जाणार आहे.

१०० टक्के नोंदणीचे उद्दिष्ट

जिल्ह्यातील एकही पात्र कामगार ईएसआयसीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विभागांमध्ये समन्वय साधून काम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पात्र कामगारांची ओळख पटविणे, त्यांची नोंदणी करणे आणि योजनेच्या सुविधांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या बैठकीस राज्य कामगार विमा योजनेचे शाखा प्रबंधक पंकज शिंपी, सहाय्यक उत्तम चव्हाण, निर्मलकुमार नेमाणे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.