पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विकासकामे, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारणी, वायसीएम रुग्णालयातील सुविधा बळकटीकरण, जलनिस्सारण सुधारणा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन आणि विविध विकासकामांसह नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.

Jun 14, 2026 - 16:28
 0  2
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत विकासकामे, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PCMC, स्थायी समिती सभा

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १० जून २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषय मंजूर करण्यात आले. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध विभागांच्या विकासकामांना हिरवा कंदील देण्यात आला.

सभेत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामास मंजुरी देण्यात आली. संविधानातील लोकशाही, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम येथे राबविण्यात येणार आहेत.

आरोग्य क्षेत्रात वायसीएम रुग्णालयातील पाणीपुरवठा पंप व विद्युत व्यवस्थेच्या देखभालीसाठी अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली. तसेच नवीन भोसरी आणि यमुनानगर रुग्णालय परिसरातील स्वच्छता कामे, थेरगाव रुग्णालयातील सीएसआर निधीतून प्राप्त व्हेंटिलेटर व मोबाईल एक्स-रे मशीनच्या देखभाल-दुरुस्ती करारालाही मंजुरी मिळाली.

याशिवाय वैद्यकीय विभागातील १७ व्हेंटिलेटर्सच्या सीएमसीसह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आवश्यक पदे सहा महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील विविध भागांतील जलनिस्सारण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी थेरगाव, गांधीनगर, बालाजीनगर, संजय गांधी नगर, शांतीनगर, चिखली, रूपीनगर, तळवडे, संत तुकाराम नगर, पिंपळे सौदागर, रहाटणी आणि जुनी सांगवी परिसरात नवीन जलनिस्सारण नलिका टाकणे तसेच दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली.

रस्ते विकासांतर्गत नाशिक फाटा ते मोशी (एनएच-६०) महामार्गावरील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती, भक्तीशक्ती चौक ते मुकाई चौक मार्गावरील दुरुस्ती, एमडीआर-३१ मार्गावरील केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन रस्त्याची देखभाल तसेच संबंधित स्थापत्य कामांना मंजुरी देण्यात आली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बीआरटीएस कॉरिडॉरमधील पावसाळी पाण्याच्या नलिकांची साफसफाई, पुणे-आळंदी बीआरटीएस मार्गावरील रेलिंग, रोड फर्निचर पेंटिंग आणि इतर स्थापत्य कामांना मान्यता देण्यात आली.

स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम राबविणे, दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प चालविणे, तसेच तळवडे बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी २८६ किलोवॅट उच्चदाब वीजपुरवठा घेण्यास मंजुरी देण्यात आली.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, मंजूर करण्यात आलेले विषय शहराच्या शाश्वत, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. संविधान भवन, आरोग्य सुविधा सक्षमीकरण, जलनिस्सारण सुधारणा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0