कोल्हापूर जिल्ह्यात PLFS व ASUSE सर्वेक्षणास प्रारंभ; रोजगार आणि असंघटित क्षेत्राची अचूक माहिती संकलित होणार

केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत कोल्हापूर जिल्ह्यात PLFS आणि ASUSE सर्वेक्षणांना प्रारंभ झाला आहे. या सर्वेक्षणांद्वारे रोजगार, बेरोजगार, स्वयंरोजगार तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांची विश्वासार्ह माहिती संकलित केली जाणार असून विकास नियोजन आणि कल्याणकारी योजनांसाठी ही आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे.

Jun 15, 2026 - 22:02
 0  2
कोल्हापूर जिल्ह्यात PLFS व ASUSE सर्वेक्षणास प्रारंभ; रोजगार आणि असंघटित क्षेत्राची अचूक माहिती संकलित होणार
PLFS सर्वेक्षण, ASUSE सर्वेक्षण, कोल्हापूर जिल्हा,

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी, दि. 15 : केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला आहे. या सर्वेक्षणांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रोजगार, बेरोजगार, स्वयंरोजगार तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांविषयीची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती संकलित केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते या सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपायुक्त श्रीमती सीमा आर्दाळकर, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, सांख्यिकी अधिकारी गजानन पाटील तसेच सहायक संशोधन अधिकारी शमा काकडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले की, रोजगार, बेरोजगार, स्वयंरोजगार, लघु उद्योजकता आणि असंघटित क्षेत्रातील आर्थिक उपक्रमांची माहिती शासनाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. या सर्वेक्षणातून मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारे रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, सामाजिक सुरक्षा तसेच स्थानिक विकासाशी संबंधित विविध धोरणे अधिक प्रभावीपणे राबविता येतील.

PLFS सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील रोजगार आणि बेरोजगारीची स्थिती, स्वयंरोजगार आणि असंघटित रोजगाराचे स्वरूप याबाबत माहिती उपलब्ध होणार आहे. तर ASUSE सर्वेक्षणातून असंघटित उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील उद्योग व व्यावसायिक उपक्रमांची माहिती संकलित केली जाणार आहे.

ही माहिती ‘विकसित भारत @ 2047’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून राज्य आणि जिल्हास्तरीय विकास आराखडे तयार करण्यासाठी, जिल्हा सकल देशांतर्गत उत्पन्नाचे अंदाज निश्चित करण्यासाठी तसेच विविध शासकीय आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेचे प्रशिक्षित अन्वेषक आणि पर्यवेक्षक निवडक नमुना पद्धतीने निवडलेल्या कुटुंबांना आणि उद्योग-व्यवसायांना भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. सर्वेक्षणादरम्यान गोळा करण्यात येणारी वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे आणि अचूक व परिपूर्ण माहिती द्यावी. नागरिकांच्या सहभागातूनच जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वास्तव चित्र समोर येणार असून त्याआधारे प्रभावी धोरणे आखता येणार आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0