उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी; नागपुरात गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन

नागपूरच्या गोंडखैरी येथे अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे सांगितले. ६०० कोटींच्या या प्रकल्पातून १५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

May 24, 2026 - 23:32
 0  2
उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी; नागपुरात गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन
देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, नागपूर लॉजिस्टिक्स पार्क

नागपूर, दि. २४ मे २०२६ : सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असून भारताला जागतिक पुरवठा साखळीतील प्रभावी भाग बनण्यासाठी स्पर्धात्मक बनणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूरजवळील गोंडखैरी येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक्स पार्कच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार डॉ. आशिष देशमुख, परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, कृष्णकुमार गुप्ता तसेच हल्दीराम समूहाचे शिवकिसन अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्याच्या घडीला उत्पादन क्षेत्रासमोर लॉजिस्टिक्सवरील खर्च हे मोठे आव्हान आहे. मात्र, योग्य नियोजन आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारून जागतिक स्पर्धेत सक्षमपणे उतरता येईल. नागपूर आणि गडचिरोली परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आकर्षित होत असून त्यामुळे लॉजिस्टिक्स क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत.

ते पुढे म्हणाले की, लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विस्तारामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून गोंडखैरी येथील हा प्रकल्प नागपूरच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांमुळे लॉजिस्टिक्स खर्चात बचत : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करण्यावर भर दिला. ते म्हणाले, मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास इंधन खर्च कमी होईल, पर्यावरण संवर्धनाला मदत होईल आणि पर्यायाने लॉजिस्टिक्सवरील एकूण खर्चातही मोठी बचत होऊ शकते.

गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महावीर जैन यांनी प्रस्ताविकातून प्रकल्पाची माहिती दिली, तर राजन अग्रवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

असा आहे अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्क

मध्य भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक औद्योगिक लॉजिस्टिक्स पार्कपैकी एक असलेला हा प्रकल्प सुमारे १०५ एकर जागेवर विकसित करण्यात आला आहे. तब्बल २५ लाख चौरस फूट ‘वर्ग अ’ दर्जाची गोदाम क्षमता या प्रकल्पात उपलब्ध करण्यात आली आहे.

या पार्कमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित स्मार्ट वेअरहाऊसिंग सुविधा विकसित करण्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मालसाठा आणि वितरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून सुमारे १५ हजार रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ आणि समृद्धी महामार्गाशी जोडलेल्या या प्रकल्पात सुमारे ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे.

उद्योग, उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी दिशा देणारा हा प्रकल्प नागपूरसह विदर्भाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0