मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत सिकलसेल-थॅलेसेमिया तपासणी शिबिर; लवकरच सुरू होणार CVS तपासणी केंद्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीतील महिला व बाल रुग्णालयात सिकलसेल व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन. जिल्ह्यात लवकरच CVS तपासणी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.
गडचिरोली | प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात सिकलसेल आणि थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गर्भवती माता (ANC Mothers) आणि सिकलसेल रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उडके, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलानके, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत आवळे, डॉ. अमरीश तिवारी तसेच अधिपरिचारिका अधिकारी कविता पोतराजवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गर्भवती मातांनी वेळेत तपासणी करणे आवश्यक
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. माधव शिंदे यांनी सिकलसेल रुग्णांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, तसेच सर्व गर्भवती महिलांनी गर्भधारणेच्या पहिल्या १२ आठवड्यांत सिकलसेल व थॅलेसेमियाची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. तपासणी पॉझिटिव्ह आल्यास तातडीने कोरिऑनिक व्हिलस सॅम्पलिंग (CVS) चाचणी करून पुढील वैद्यकीय उपचार सुरू करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उडके यांनी वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स आणि आशा स्वयंसेविकांना सिकलसेल व थॅलेसेमियाबाबत व्यापक जनजागृती आणि समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या.
गडचिरोलीत लवकरच सुरू होणार CVS तपासणी केंद्र
या कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी महत्त्वाची घोषणा करत गडचिरोली जिल्ह्यातील सिकलसेल आणि थॅलेसेमियासारख्या आनुवंशिक आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महिला व बाल रुग्णालयात लवकरच कोरिऑनिक व्हिलस सॅम्पलिंग (CVS) तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे गर्भातील बाळाला सिकलसेल किंवा थॅलेसेमियाचा धोका आहे की नाही, याचे निदान गर्भावस्थेतच करता येणार असून, आजारग्रस्त बालकांच्या जन्माचे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सिकलसेल समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका तसेच HLL टीमच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला गर्भवती माता आणि रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.
आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सिकलसेल व थॅलेसेमियासारख्या गंभीर आनुवंशिक आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने गडचिरोली जिल्ह्याने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0