रेबीजमुक्त मुंबई'साठी महापालिकेचा मोठा पुढाकार; WVS-HOPE/Mission Rabies India सोबत सामंजस्य करार
मुंबईला रेबीजमुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि WVS-HOPE/Mission Rabies India यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार झाला. भटक्या श्वानांचे मोफत लसीकरण, जनजागृती आणि रेबीज सर्व्हिलन्स उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुंबई | प्रतिनिधी : देवानंद शिंदे
मुंबईतील भटक्या श्वान आणि मांजरींमुळे होणाऱ्या रेबीजच्या धोक्याला आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'रेबीजमुक्त मुंबई' या उद्दिष्टासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-होप/मिशन रेबीज इंडिया (WVS-HOPE/Mission Rabies India) यांच्यात गुरुवारी (२३ जुलै २०२६) महापालिका मुख्यालयात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या कराराअंतर्गत संबंधित संस्था मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे रेबीजविरोधी लसीकरण पूर्णपणे नि:शुल्क करणार असून, शहरात रेबीज निर्मूलनासाठी व्यापक जनजागृती, सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
हा सामंजस्य करार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी उप आयुक्त (विशेष) विनायक विसपुते, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, तसेच मिशन रेबीज इंडियाचे संचालक आणि WVS-HOPE चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बालाजी चंद्रशेखर उपस्थित होते.
२०२६ ते २०२८ या कालावधीसाठी करार
महानगरपालिकेने २०२६ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा करार केला असून, या कालावधीत मुंबईत मोठ्या प्रमाणावर रेबीज प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
'रेबीजमुक्त मुंबई'साठी चार प्रमुख उपक्रम
या करारांतर्गत पुढील महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत:
रेबीजविषयी व्यापक जनजागृती आणि नागरिकांचे शिक्षण
रेबीज प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रसार
भटक्या श्वानांचे मोठ्या प्रमाणावर रेबीज प्रतिबंधक लसीकरण (Mass Dog Vaccination)
रेबीज सर्व्हिलन्स (Rabies Surveillance) प्रणाली अधिक प्रभावी करणे
२०३० पर्यंत रेबीज निर्मूलनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट
यावेळी बोलताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सांगितले की, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २०३० पर्यंत श्वानांपासून होणाऱ्या रेबीजचे निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
तसेच, भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मानक कार्यपद्धतीनुसार सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी भटक्या श्वानांचे लसीकरण करून रेबीज नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
महापालिकेचा सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य
महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला रेबीजमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, हा सामंजस्य करार त्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे मुंबईतील भटक्या श्वानांचे लसीकरण अधिक वेगाने होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांमध्ये रेबीजबाबत जागरूकता वाढून सार्वजनिक आरोग्य अधिक सुरक्षित होण्यास हातभार लागणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1