आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य दिंडी सोहळा; कामगार वारकरी मेळाव्यासह सांगता समारंभाचे आयोजन
आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य दिंडी, कामगार वारकरी मेळावा व सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, दोन हजारांहून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २४ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शनिवारी (दि. २५ जुलै) भव्य दिंडी, कामगार वारकरी मेळावा आणि सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाचा भक्ती, समता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, दि. २५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता संत तुकाराम नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून दिंडीला प्रारंभ होईल. मंदिराचे व्यवस्थापन श्री. दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, दिंडीत श्री विठ्ठल-रुक्मिणींची प्रतिमा, संत तुकाराम महाराजांची गाथा, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी तसेच माऊलींची पालखी सहभागी होणार आहे.
तुकारामनगर, वल्लभनगर आणि महेशनगर परिसरातून मार्गक्रमण करत ही दिंडी दुपारी सुमारे २.३० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरात पोहोचेल. त्यानंतर कामगार वारकरी मेळावा, वैष्णव मेळावा, भजन-कीर्तन आणि सांगता समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात देहू आणि आळंदी येथील कीर्तनकार, भजनी मंडळे, वारकरी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यंदाच्या दिंडी सोहळ्यात सुमारे दोन ते अडीच हजार श्रमिक, वारकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध समाजघटकांतील भाविक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सर्व धर्मीय नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून, वारकरी परंपरेतून सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे आणि सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
"वारकरी संप्रदाय हा समाजात समता, बंधुता, सेवा आणि मानवतेची प्रेरणा देणारा आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी या भक्तिमय दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठल भक्तीचा आनंद घ्यावा," असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0