राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौरांच्या हस्ते गौरव
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित सीएसआर संवाद बैठकीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामीण व शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ११ जून २०२६ : राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी काढले. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवून सरकारी शाळांचा कायापालट घडवून आणण्यात वारे गुरूजींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथील दिव्यांग भवन फाऊंडेशनमध्ये सीएसआर कक्षाअंतर्गत विविध उद्योगसमूहांसोबत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सहआयुक्त मनोज लोणकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध उद्योगसमूहांचे सीएसआर प्रतिनिधी उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, वाबळेवाडी आणि जळिंदरनगर येथील शाळांमध्ये दत्तात्रय वारे यांनी राबविलेल्या अभिनव शैक्षणिक प्रयोगांमुळे सरकारी शाळांबाबत पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी मार्ग त्यांनी दाखवून दिला असून त्यांच्या कार्यामुळे सरकारी शाळाही जागतिक दर्जाचे शिक्षण देऊ शकतात, हा विश्वास समाजात निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त करूनही वारे गुरूजी विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. आजच्या पिढीला सक्षम, सुसंस्कृत आणि स्पर्धात्मक बनविण्यासाठी त्यांनी सुरू केलेली शैक्षणिक चळवळ देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे महापौरांनी सांगितले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना दत्तात्रय वारे म्हणाले की, गेली तीन दशके शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. शासकीय शाळांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण उपलब्ध करून देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यभरातील अनेक शिक्षक या शैक्षणिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी झाले असून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्य समर्पित करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष : दत्तात्रय वारे गुरूजींची उल्लेखनीय कामगिरी
दत्तात्रय वारे यांनी जिल्हा परिषद शाळा, वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे कार्यरत असताना अवघ्या तीन वर्षांत विद्यार्थी संख्या ३२ वरून तब्बल ७२१ पर्यंत वाढविली. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेत प्रवेशासाठी सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार झाली. वाबळेवाडी शाळेला भारतातील पहिली ‘झिरो एनर्जी’ शाळा म्हणून ओळख मिळाली असून महाराष्ट्र शासनाने तिला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेचा मान दिला.
त्यानंतर जळिंदरनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद शाळेतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. दोन वर्षांत विद्यार्थी संख्या ३ वरून १५० पर्यंत वाढली असून प्रवेशासाठी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार झाली. या शाळेने जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत ‘टॉप १०’ मध्ये स्थान मिळवून जागतिक स्तरावर मानाचा ठसा उमटविला.
दत्तात्रय वारे यांनी भारतीय परिस्थितीला अनुरूप आणि जागतिक शिक्षण व्यवस्थेला समकक्ष अशी पर्यायी शिक्षण प्रणाली विकसित केली आहे. या मॉडेलसाठी आयआयएम अहमदाबाद ज्ञानसहभागी म्हणून कार्यरत असून महाराष्ट्रातील सुमारे साडेचार लाख शिक्षकांना या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २०१६ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच वर्ल्ड्स बेस्ट स्कूल अवॉर्ड्स २०२५, कम्युनिटी चॉईस अवॉर्ड – बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल आणि सृष्टी सन्मान पुरस्कार यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0