हडपसरमध्ये ‘यशदा’च्या धर्तीवर महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संकुल उभारणार; आदिती तटकरे यांचे निर्देश
पुण्यातील हडपसर येथे महिला व बालविकास विभागाच्या जागेवर ‘यशदा’च्या धर्तीवर अत्याधुनिक महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संकुल उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. या संस्थेमार्फत अधिकारी, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविकांना विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुंबई प्रतिनिधी
दि. 10 : पुण्यातील हडपसर येथे महिला व बालविकास विभागाच्या मालकीच्या जागेवर ‘यशदा’च्या धर्तीवर अत्याधुनिक महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संकुल उभारण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेस जागा उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी मंत्री तटकरे यांनी संस्थेसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या संस्थेच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागासह विविध शासकीय विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत, प्रशासकीय तसेच तांत्रिक प्रशिक्षण देणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पायाभूत, प्रेरणादायी आणि उजळणी स्वरूपाचे प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे देता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), एकात्मिक बाल संरक्षण योजना (ICPS) तसेच विभागाच्या विविध शाखांना केंद्र शासनाकडून प्रशिक्षणासाठी उपलब्ध होणारा निधी संस्थेकडे वर्ग करणे, आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, रिक्त व कंत्राटी पदांची भरती, प्रशिक्षण आराखड्यास मंजुरी, लेखापरीक्षण व्यवस्था आणि विकास निधीचा प्रभावी वापर यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षण संकुलामुळे महिला व बालविकास विभागाच्या प्रशिक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असून राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळणार आहे.
बैठकीस आयुक्त डॉ. जगदिश मिनियार, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, उपआयुक्त सुवर्णा पवार, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0